पुणे- पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांची अखेर बदली झाली आहे. पोळ यांची महावितरणच्या अप्पर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पोळ यांनी जुलै 2012 मध्ये पुणे पोलिस आयुक्तपदाची सूत्रे ताब्यात घेतली होती. त्यांच्या नियुक्तीनंतर पुण्यातील जंगली महाराज रोडवर साखळी बॉम्बस्फोट झाले होते. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांची मागील वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यात हत्या करण्यात आली होती. या मारेक-यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे पोळ यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला होता.
दाभोळकरांच्या मारेक-यांचा शोध लागत नसेल तर पुणे पोलिस दलाचे नेतृत्त्व बदलावे, अशी भूमिका दाभोळकरांच्या कुटुंबियांनी घेतली होती. मात्र त्याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले होते. अखेर राज्यातील बड्या अधिका-यांच्या बदल्या झाल्यानंतर पोळ यांची बदली झाली आहे.
पोळ यांच्या जागेवर अप्पर पोलिस महासंचालक सतीशचंद्र माथुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.