आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोनसच्या रकमेवर पोलिसांचाच डल्ला, 96 लाख लूटणा-या पोलिसांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कंपनीच्या कर्मचा-यांना वाटण्यासाठी बॅंकेतील काढलेली 96 लाख रूपयांची रक्कम पुण्यातील पोलिसांनी लूटल्याची घटना पुढे आली आहे. हडपसर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी हा प्रताप केला आहे. याप्रकरणी दोन पोलिसांसह चौघांना अटक केली आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्याचा सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीधर यादव व पोलिस शिपाई गणेश मोरे या दोघांना अटक केली आहे. तसेच या दोघांना लूट करण्यासाठी साथ देणा-या अविनाश देवकर आणि रविंद्र सोपान मोरे यांनाही हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी कंपनीतील वाहनचालक विशाल भेंडे याने फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, दिवाळी जवळ आल्याने कंपनीच्या कर्मचा-यांना बोनस वाटण्यासाठी वासन आय केअर या कंपनीचे अधिकारी एका वाहनाने पहाटेच्या सुमारास चालले होते. हडपसरच्या पुढे म्हणजेच मांजरीतील गंधर्वनगरी येथे हे अधिकारी राहत असल्याने ते घरी फ्रेश होण्यासाठी गेले. यावेळी कंपनीच्या गाडीत पैसे व तेथे फक्त वाहनचालक विशाल भेंडे थांबला होता. पहाटे चारच्या सुमारास हडपसर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीधर यादव आणि पोलिस शिपाई मोरे हे आपले दोन सहकारी देवकर व माने यांच्यासह तेथे गेले. येथे वाहन का थांबवले आहे असे विचारून वाहनचालकास दमदाटी करण्यास सुरुवात केली. यानंतर या चौघांनी भेंडे यास मारहाण करीत मांजरी पोलिस ठाण्यात नेले.
त्यानंतर भेंडे यांच्या गाडीतील सुमारे 96 लाख रूपये या चौघांनी काढून त्याला पहाटे हाकलून दिले. त्यानंतर भेंडे यांनी घडलेला सर्व प्रकार वासन आय केअरच्या अधिका-यांना सांगितला. यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांनी वरिष्ठ पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी या घटनेची चौकशी करून गिरीधर यादव याच्यासह मोरे, देवकर व माने या चौघांना बेड्या ठोकल्या. अधिक तपास हडपसर पोलिस करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...