आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- पुणे शहरातील हडपसर भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या पदाधिका-याच्या हत्येचा कट पुणे पोलिसांनी उधळून लावला आहे. या नेत्याच्या हत्येसाठी त्यांच्याच कारच्या ड्रायव्हरने तब्बल 1 कोटी रूपयांना हत्येची सुपारी दिल्याचेही समोर आले आहे. पुणे पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे तर दोघे फरार आहेत.
या प्रकरणी पुणे पोलिसांनी आनंद शिवकुमार भोपे (वय 38, रा. हडपसर), अनंत दत्तात्रेय मोढवे (वय 42, रा. नगर), नितीनकुमार मच्छिंद्र पिसे (वय 27, रा. भिगवण रेल्वे स्टेशन), बंटी ऊर्फ ओंकार जालिंदर बेंद्रे (वय 21, रा. कर्जत, जि. नगर) यांना अटक केली आहे.
आरोपी आनंद भोपे हा या खुनाच्या कटामागील मुख्य सूत्रधार आहे. तर भोपेचे आणखी दोन मित्र राजेंद्र शितोळे आणि बंडू दामू मासाळ हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील राष्ट्रवादीच्या एका स्थानिक नेत्याकडे आरोपी आनंद भोपे हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. संबंधित राष्ट्रवादीचा नेता हा जमिन खरेदी-विक्रीचे व्यवहार करतो. त्यामुळे आनंद भोपे हा देखील त्यांचे काही व्यवहार हाताळत होता. मुंढव्यातील अडीच एकर जमिनीच्या विक्रीचे काम या नेत्याने आरोपी भोपेला दिले होते. मात्र, भोपेने बनावट सही करून परस्पर पॉवर ऑफ ऑटोर्नी करून घेतली व त्यातील काही जमिन विकली. त्याचे पैसे मालकाला न देता परस्पर वापरले. मात्र, याची माहिती या नेत्याला लागताच त्याने पैशाची मागणी केली.
मात्र, ही रक्कम काही कोटींच्या घरात असल्याने ड्रायव्हर आनंद भोपेने या नेत्याच्या हत्येची सुपारी तब्बल 1 कोटी रूपयांना दिली. यासाठी त्याने आनंत मोढवे, नितीनकुमार पिसे, बंटी बेंद्रे, राजेंद्र शितोळे आणि बंडू मासाळ यांना त्या हत्येची सुपारी दिली. यातील अडवान्स रक्कम म्हणून 32 लाख रूपयेही देऊन टाकले. बंटी ऊर्फ ओंकार बेंद्रे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर कर्जत आणि अहमदनगर पोलीस ठाण्यात खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात तो गेल्या दीड वर्षापासून फरार आहे. तर सध्या फरार असलेल्या मासाळविरोधात करमाळा पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक अहमदनगर येथे तपासासाठी गेले असता मोढवे, बेंद्रे व पिसे एका हॉटेलात असल्याची माहिती मिळाली. तसेच त्यांनी एका मोठ्या राजकीय नेत्याच्या हत्येची सुपारी घेतल्याचे खब-यामार्फत कळाले. पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून ताब्यात घेतले असता त्यांनी आरोपी आनंद भोपेकडून हत्येची सुपारी घेतल्याचे सांगितले. यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. यातील चार आरोपींना अटक केली आहे तर दोघे जण अद्याप फरार चालले आहेत.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, असा उघडकीस आला या हत्येचा कट.....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.