आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राह्मण समाजाचेही व्होट बँक राजकारण, नरेंद मोदींना पाठिंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील 48 पैकी 37 मतदारसंघांमध्ये ब्राह्मण मतदार महायुतीच्या उमेदवारांना मतदान करणार असून 11 मतदारसंघांत स्थानिक लोकांच्या मतानुसार इतर पक्षीयांना मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते रविकिरण साने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ज्येष्ठ उद्योगपती डी. एस. कुलकर्णी, महासंघाचे सरचिटणीस विश्वजित देशपांडे, अमोघ टेंभेकर, प्रदेश युवा अध्यक्ष लक्ष्मीकांत धडफळे, अशोक वझे आदी या वेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाची लोकसंख्या निवडणुकीच्या निर्णयावर परिणाम करणारी आहे. मात्र, आजतागायत यादृष्टीने विचार झाला नाही. अलीकडच्या काळात ब्राह्मणांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ‘व्होट बँक’ तयार करण्याची गरज जाणवू लागली. दोन वर्षांपासून या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. ब्राह्मणांच्या विविध संघटनांना एकत्र आणण्यात आम्हाला यश मिळाले आहे. शिवसेना, मनसे, भाजप तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा करून आम्ही निर्णय घेतला, असे साने म्हणाले.

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांबद्दलची नाराजी ब्राह्मण समाजामध्ये होती. त्यामुळे प्रारंभी महासंघाने नकाराधिकार वापरण्याचे ठरवले होते. राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये प्रतिनिधी पाठवून महासंघाने स्थानिक संघटना व समाजातील मान्यवरांची मते जाणून घेतली. त्यानंतर कोणा एका पक्षाला पाठिंबा न देता मतदारसंघनिहाय मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणूनच कल्याणसारख्या मतदारसंघात आनंद परांजपे हा ब्राह्मण उमेदवार असूनही त्यांना मतदान न करता शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला, असे या वेळी सांगण्यात आले.

राष्ट्राप्रती निष्ठा हवी
‘फक्त ब्राह्मण उमेदवारालाच मतदान करण्याची भूमिका नाही. स्वच्छ चारित्र्य, राष्ट्राप्रती निष्ठा आणि ब्राह्मणांबद्दल आपुलकी ठेवणार्‍या कोणत्याही पक्षाला मतदान करण्याचा निर्णय आहे. सुशीलकुमार शिंदे, प्रफुल्ल पटेल, उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळे, गुरुदास कामत (काँग्रेस आघाडी) अभिजित पानसे, आदित्य शिरोडकर (मनसे) आदी महायुतीबाहेरच्या 11 उमेदवारांना मतदान करू.’’ - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

राज्यात अठरा टक्के
महाराष्ट्रात साडेतीन टक्के ब्राह्मण असल्याचे सांगितले जाते. यात तथ्य नाही. मराठी भाषिक ब्राह्मणांच्या 31 पोटशाखा असून त्यांची लोकसंख्या बारा टक्के आहे. गुजराथी, राजस्थानी, दाक्षिणात्य, बंगाली, उत्तर प्रदेशी आदी परप्रांतीय ब्राह्मण सहा टक्के आहेत. राज्यात एकूण अठरा टक्के असलेल्या ब्राह्मणांना एका छत्राखाली आणण्याचे प्रयत्न गेली सहा वर्षे सुरू आहेत. पुणे, कल्याण यासारख्या पंधरा लोकसभा मतदारसंघांत ब्राह्मण मतदारांची संख्या 12 ते 20 टक्के आहे. यातील जास्तीत जास्त मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी महासंघाने रणनीती आखली आहे.