आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रमी मतदानामुळे उमेदवारांच्या पोटात गोळा;मतदार यादीत घोळ झाल्याने पुणेकर संतप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मतदारांच्या अमाप उत्साहामुळे पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांत विक्रमी मतदान झाले. सकाळी सात वाजेपासूनच मतदारांनी केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. तर दुसरीकडे, मतदार यादीत नाव नसल्याने हजारो मतदारांना परत फिरावे लागल्याने बहुतेक ठिकाणी निराशा आणि संतापाचे वातावरण होते. पुण्याचे पोलिस आयुक्त सतीश माथूर यांच्यासह हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे उमेदवारांच्या पोटात मात्र गोळा उठला. पारंपरिक मतपेढीच्या आधारे जय-विजयाची समीकरणे मांडणार्‍या राजकीय कार्यकर्त्यांमध्ये वाढीव टक्का कोणाच्या पारड्यात जाणार, याचीच चर्चा रंगली होती.

पुण्यात दुपारी तीनपर्यंत 33.91 टक्के, बारामतीमध्ये 34.98 टक्के, मावळात 34.91 आणि शिरूर मतदारसंघात 36.87 टक्के मतदान झाले होते. उन्हाचा कडाका कमी झाल्यानंतर मतदान केंद्र्रावरील गर्दी वाढली. मतदानासाठी रांगा लागल्याने दीड-दीड तास थांबावे लागले, तरी मतदारांमध्ये मतदानाबद्दलची उत्सुकता होती.

अनिल शिरोळे, बारणेंना अनुकूल
पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी सकाळी नऊपूर्वीच सहकुटुंब मतदान केले. यात अनिल शिरोळे (भाजप), दीपक पायगुडे (मनसे), श्रीरंग बारणे (शिवसेना), शिवाजीराव आढळराव (शिवसेना), देवदत्त निकम (राष्ट्रवादी), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश होता. पुण्यातून अनिल शिरोळे (भाजप), बारामतीमधून सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) आणि शिरूरमधून शिवाजीराव आढळराव (शिवसेना) यांना अनुकूल मतदान झाल्याचे सांगितले जाते. मावळातून श्रीरंग बारणे (शिवसेना) आणि लक्ष्मण जगताप (शेकाप) यांच्यात चुरस असून अंदाज वर्तवणेही कठीण असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

मतदानासाठी ‘सेलिब्रिटीं’ची गर्दी
94 वर्षांचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार तसेच ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, उपेंद्र लिमये, गिरीश कुलकर्णी, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्र्णी (ज्युनियर), आनंद इंगळे, मृण्मयी देशपांडे आदी कलावंतांनी मतदानाला आवर्जून हजेरी लावली. अमोल पालेकर, संध्या गोखले यांना मात्र मतदार यादीत नाव नसल्यामुळे केंद्रावरून परत फिरावे लागले.

अशोक चव्हाण माझ्यापेक्षा लकी : सुरेश कलमाडी
पुण्याचे विद्यमान खासदार आणि कॉँग्रेसचे निलंबित नेते सुरेश कलमाडी यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर कलमाडी यांना याही वेळी ‘पंजा’च का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी हसत उत्तर देणे टाळले. उमेदवारी नाकारल्याची खंत याही वेळी त्यांनी बोलून दाखवली. अशोक चव्हाण माझ्यापेक्षा जास्त लकी असल्याचे ते म्हणाले. पुणे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांचे नाव सांगली जिल्ह्यातल्या त्यांच्या मूळ गावी कडेगाव येथील मतदारयादीत आहे. त्यामुळे राजकीय कारकीर्दीतील पहिलीच निवडणूक लढवणारे कदम व त्यांचे कुटुंबीय स्वत:चे मत स्वत:ला देऊ शकले नाहीत.

सुप्रियाला नाही शरद पवारांचे मत
मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवता यावी यासाठी शरद पवार यांनी बारामतीमधील मतदार यादीतील नाव कमी करून ते मुंबईत नोंदवले. त्यामुळे यंदा प्रथमच शरद पवार व त्यांच्या पत्नी बारामतीमध्ये मतदान करू शकले नाहीत. त्यांची कन्या सुप्रिया सुळे बारामतीतल्या उमेदवार आहेत. त्यांना शरद पवारांचे मत मिळू शकले नाही. स्वत: सुळे व चुलत भाऊ अजित पवार यांनी सकाळीच मतदान केले.

बटण दाबले की काँग्रेसला मतदान
पुण्यातील श्यामराव कलमाडी शाळेतील मतदान केंद्रात ईव्हीएमचे कोणतेही बटण दाबले की कॉँग्रेसला मतदान होत असल्याचे सकाळी काही जागरूक मतदारांच्या लक्षात आले. त्यांच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकार्‍यांनी तातडीने ईव्हीएम मशीन बदलले. अन्यत्र काही ठिकाणीही असे प्रकार झाल्याचे मतदारांनी सांगितले. उमेदवारी याद्यांत नाव नसल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली. भाजपचे अनिल शिरोळे व काही मतदारांनी याबाबत जिल्हाधिकार्‍यांना घेराव घालून जाब विचारला. शिरोळे यांनी उपोषणाचा तर ‘आप’चे सुभाष वारे यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला.