आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील महिलांना हवे आरक्षण अन् संरक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - निवडणुका आल्या की राजकीय पक्ष आश्वासनांची खैरात करणारे जाहीरनामे काढतात. पण देशातील निम्म्या लोकसंख्येचा आवाज कुणीच ऐकत नाही. निवडणुकीसाठी फक्त ताई, माई, आक्कांना साद घातली जाते, प्रत्यक्षात महिला आरक्षण विधेयकही मंजूर होत नाही. या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध महिला संघटनांनी एकत्रितपणे महिलांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे.

या उपक्रमात पुण्यातील अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचा सहभाग आहे. संघटनेच्या प्रमुख व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे म्हणाल्या, ही लोकसभा निवडणूक महिलांच्या दृष्टीने निर्णायक ठरले. वाढता लैंगिक हिंसाचार, खोट्या प्रतिष्ठेपायी गुन्हे, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक महिलांवरील अत्याचार, वाढती बेरोजगारी, भूक आणि महागाई यांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे महिलांच्या मागण्यांचा जाहीरनामा उच्चरवाने सांगणे आवश्यकच आहे.

राजकीय आरक्षण, अन्न सुरक्षा आणि महागाई, रोजगार आणि वेतन, जमीन, पाणी, नैसर्गिक संसाधने, सामाजिक विकास, अर्थसंकल्पातील तरतुदी, नागरी अधिकारांचे संरक्षण, स्त्रियांवरील हिंसाचार आणि कायदेशीर मुद्दे या घटकांवर भर देण्यात आला आहे. देशातील सर्वच महिलांपर्यंत हा जाहीरनामा पोहचवण्यासाठी तो सर्व भाषांमध्ये अनुवादित करण्यात येत आहे.

प्रमुख मागण्या
0 राजकीय आरक्षण विधेयक संमत करा.
0 स्त्रियांवरील हिंसाचाराची सर्व प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत निकाली काढा.
0 स्त्रियांच्या बचत गटांना प्राधान्याने पतपुरवठा करा व 4 टक्के व्याजदर द्या.
0 50 हून अधिक वयाच्या स्त्रियांना सार्वत्रिक पेन्शन योजना राबवा.
0 पोटगी कायदे बळकट करा.
0 स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व रुजवण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात दुरुस्त्या करा.
0 स्त्रियांचे विकृत व भडक चित्रण करणार्‍या माध्यमांसाठी आचारसंहिता कडकपणे राबवा.

नियुक्तीत हवा पारदश्रीपणा
राष्ट्रीय व राज्य महिला आयोगाचे काम स्वायत्त पद्धतीने चालावे. त्यासाठी महिला आयोगांवर केल्या जाणार्‍या सदस्यांच्या नेमणुका स्वतंत्रपणे आणि पारदर्शकपणे कराव्यात. या नेमणुका कोणत्याही परिस्थतीत राजकीय हेतूने प्रेरित नसाव्यात, तर स्त्री चळवळीशी संबंधित व अनुभवी स्त्रियांचा विचार त्यासाठी केला जावा, अशी आमची मागणी आहे. - किरण मोघे, प्रमुख, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, पुणे.