पुणे - देशातील महत्त्वपूर्ण गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू असलेल्या पुण्यनगरीत अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडई येथून सुरू झालेली गणरायाची विसर्जन मिरवणूक मंगळवारी दुपारी ३ वाजून ४२ मिनिटांनी म्हणजेच तब्बल २९ तास १२ मिनिटांनी अलका चौकात समाप्त झाली. पुणे आणि पिंपरी परिसरात एकूण चार हजार ३४ सार्वजनिक गणेश मंडळांनी, तर चार लाख ६३ हजार ८० घरगुती गणपतींना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते पूजा होऊन मुख्य विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. अकराव्या दिवशी त्यामध्ये एकूण दोन हजार ७३९ सार्वजनिक व एक लाख ९८ हजार ४९८ घरगुती मंडळांनी विसर्जन केले. मुख्य मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने २२९, टिळक रस्त्याने १६१, कुमठेकर रस्त्याने ३४, तर केळकर रस्त्याने १२३ गणेश मंडळांनी गणपतीचे विसर्जन केले. मंगळवारी दुपारी िसद्धेश्वर घाटावर गणेश पेठेतील त्रिमूर्ती तरुण मंडळाचा शेवटचा गणपती विसर्जित झाला.
बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावर मार्गस्थ होणार्या मिरवणुकीत रात्रीचे मानाचे गणपती जिलब्या मारुती मंडळ, बाबू गेनू मंडळ, भाऊ रंगारी मंडळ, अखिल मंडई मंडळ व श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळ यांना दरवर्षीपेक्षा यंदा विसर्जनास एक ते दीड तास उशीर झाला. ढोल-ताशा पथके, बँड पथके, नगारावादन, गणपतीचा भव्य रथ यामुळे एक-एक गणपती मार्गस्थ होण्यास वेळ लागत होता. मंगळवारी सकाळी सहा वाजून दहा मनििटांनी वरुणराजाच्या साक्षीने श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचा रोषणाई असलेला दिमाखदार रथ अलका चौकात आल्यानंतर भाविकांनी मंगलमय वातावरणात गणरायाला निरोप दिला.