आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी कादंबरी, कविता, कथांचा त्रिखंडात्मक प्रकल्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - स्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या काळात लक्षणीय स्वरूपाचे साहित्य निर्माण करून समाजजीवनाचे सांस्कृतिक उन्नयन करणारा स्त्रीलिखित मराठी कादंबरी, कथा आणि कविता हा त्रिखंडात्मक प्रकल्प कार्यान्वित झाला असून या प्रकल्पातील पहिला कादंबरी खंड पूर्ण झाला आहे. कथा खंड अंतिम टप्प्यात असून कविता खंडाचे काम सुरू झाले आहे. येत्या सहा महिन्यांत उर्वरित खंडही अभ्यासकांना उपलब्ध होतील.
ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांच्या साक्षेपी संपादन मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठाच्या शाश्वती स्त्री सर्जनशक्ती विकास केंद्राच्या वतीने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पद्मगंधा प्रकाशनातर्फे अरुण जाखडे यांनी तो प्रकाशित केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मोजक्या कसदार लेखिकांनी त्या काळात मुख्यत: बहुतांश पुरुष लेखकांनी उभी केलेली जी कृतक आणि सांकेतिक स्त्री प्रतिमा होती, ती मोडण्याचे धाडस केले. त्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्योत्तर गेल्या साठ वर्षांच्या काळातील लेखिकांनी ती हळूहळू नाहीशी केली आणि गांभीर्याने लेखनव्यवहार करणार्‍यानिवडक लेखिकांनी प्रतिमांचे मोह दूर ठेवून आत्मशोधाची वाट पक्की केली. अशा प्रतिमामुक्त लेखनाचा अवकाश या लेखिकांनी कसा मिळवला, याची नि:संदिग्ध कल्पना या ग्रंथातून वाचक-अभ्यासकांना येईल, असे मनोगत ढेरे यांनी व्यक्त केले.

कादंबरीच्या लेखिका
कमल देसाई, ज्योत्स्ना देवधर, आशा बगे, निर्मला देशपांडे, गौरी देशपांडे, तारा वनारसे, रोहिणी कुलकर्णी, अंबिका सरकार, शांता गोखले, सानिया, कविता महाजन.
कथा खंडातील लेखिका
कमल देसाई, विजया राजाध्यक्ष, रोहिणी कुलकर्णी, आशा बगे, गौरी देशपांडे, ऊर्मिला पवार, सानिया, मेघना पेठे, प्रतिमा जोशी, नीरजा, मोनिका गजेंद्रगडकर.

प्रत्येक खंडात अकरा महत्त्वाच्या लेखिकांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या लेखिका हयात आहेत त्यांच्या प्रदीर्घ मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यांच्या सर्व लेखनाचे व्यापक परिशीलन करून, त्यांच्या योगदानाचे महत्त्व जाणूनच लेखिकांची नावे निश्चित केली आहेत. हे त्रिखंड मराठी भाषेत असले तरी ते भारतीय व जागतिक स्तरावर पोहोचावेत यासाठी त्यांचे इंग्रजी भाषांतरही केले जाणार आहे.
डॉ. अरुणा ढेरे, ज्येष्ठ लेखिका