आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाबळेश्वरपेक्षा नगर, पुणे कूल कूल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - थंड हवेची ठिकाणे म्हणून सुपरिचित असणाऱ्या सिमला, महाबळेश्वरपेक्षा सध्या नगरकर आणि पुणेकर ‘कूल कूल’ हवामानाचा अनुभव घेत आहेत. गेल्या चार दिवसांपासून या दाेन्ही शहरे व परिसरातील किमान तापमानाचा पारा सिमला आणि महाबळेश्वरपेक्षा घसरत आहे. येत्या दोन-तीन दिवस किमान तापमान एक ते दीड अंशाने वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. मात्र, ४८ तासांनंतर पुन्हा थंडीची लाट सक्रिय होण्याचा अंदाजही देण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून नगर, नाशिक, पुणे येथील किमान तापमान ७.१ ते ९.८ अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले आहे. याच काळात सिमला आणि महाबळेश्वरमध्ये ११ ते १४ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात गेले तिन्ही दिवस सर्वात कमी तापमानाची नोंद नगरमध्ये (७.१, ७.८, ८ अंश सेल्सियस) झाली आहे. त्याखालोखाल पुणे आणि नाशिकचे किमान तापमान आहे.

‘निरभ्र आकाश, स्वच्छ हवामान असल्याने उत्तरेकडील थंड वारे थेट राज्यात पोहोचत आहेत. तसेच स्थानिक हवामानशास्त्रीय घटकांचाही परिणाम होत आहे. दुसरे म्हणजे याच काळात सिमला तसेच महाबळेश्वर परिसरात हवामान ढगाळलेले होते. त्यामुळे साहजिकच तेथील किमान तापमान तुलनेने अधिक राहिले. मात्र, कमाल तापमान नगर, नाशिक, पुण्यात अधिक नोंदले गेले आहे,’ अशी माहिती ‘अायएमडी’कडून देण्यात अाली.

पुढील ४८ तासांत राज्यात आलेली थंड हवेची लाट किंचित ओसरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे किमान तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होऊ शकते. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा किमान तापमान घसरण्याची शक्यता आहे, असे
आयएमडीच्या संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले आहे.

बहुतेक ठिकाणी पारा घसरला
राज्यात बहुतेक जिल्ह्यांत किमान तापमानाचा पारा २० अंशांपेक्षा खाली घसरला आहे. त्यामुळे राज्यभरात गारवा जाणवत आहे. विशेषत: रात्री नऊनंतर पहाटेपर्यंत थंडीचा प्रभाव अधिक आहे.
बातम्या आणखी आहेत...