आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाच्या अपहरणाचा ढोंग करणारी आई जेरबंद, 10 दिवसीय मुलीला तिनेच फेकल्याचे उघडकीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीसीटीव्हीत कैद झालेल्या घटनेतून सत्य समोर आले. - Divya Marathi
सीसीटीव्हीत कैद झालेल्या घटनेतून सत्य समोर आले.
पुणे - अाैंध परिसरातील शेवाळे हाॅस्पिटल येथून घरी जात असताना एका रिक्षाचालकासह दाेन सहप्रवाशांनी अापल्या दहा दिवसांच्या मुलीस पळवून नेल्याची तक्रार रेश्मा रियासत शेख (२६, रा. दापाेडी, पुणे) या महिलेने खडकी पाेलिस ठाण्यात बुधवारी दिली हाेती. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर २४ तासांत सदर महिलेचा बनाव उघड झाला. जाऊबाईंना पाच दिवसांपूर्वी मुलगा झाला व अापल्याला मात्र तिसरीही मुलगीच झाल्याच्या नैराश्यातून रेश्माने दहा दिवसांच्या अापल्या पाेटच्या गाेळ्याला नदीत फेकून दिल्याचे पाेलिसांच्या तपासात उघडकीस अाले. या गुन्ह्याची कबूलीही तिने दिल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
 
रेश्माचा पती रियासत शेख हा मूळ दिल्ली येथील रहिवासी अाहे. या दांपत्यास पहिली चार वर्षांची मुलगी असून त्यानंतर अडीच वर्षांचा मुलगा अाहे.  तिसऱ्या बाळंतपणात रेश्माला मुलगी झाली. मात्र, न्यूमाेनियामुळे तिचा मृत्यू झाला होता. नऊ महिन्यांपूर्वी रेश्मा आणि तिची  जाऊ गर्भवती राहिल्या. त्यात रेश्मा हिने एका मुलीस जन्म दिला तर त्यानंतर पाच दिवसांनी जाऊबाईला मुलगा झाला. पुन्हा मुलगीच झाल्याच्या नैराश्येतून रेश्माने घरात त्रागा सुरू केला. तिच्याा मुलीच्या डाेळ्याजवळ पिवळसर डाग असल्याने तिने या चिमुकलीला ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार तिने मुळा नदीपात्रात  फेकून दिले व गुन्हा लपवण्यासाठी तिचे अपहरण झाल्याचा कांगावा केला. दरम्यान, पोलिस आता नदीपात्रात बाळाचा मृतदेह शोधत आहेत.
 
रेश्माने असा रचला बनाव    
‘१६ अाॅगस्ट राेजी मी, नवजात मुलगी व माेठ्या मुलीला पतीने अाैंध राेडवर सोडले. त्यानंतर पती कामावर गेला.  तपासणीनंतर घरी परतताना बाेपाेडी येथून पायी जाताना एक रिक्षावाला विरुद्ध बाजूने अाला. त्यात रिक्षाचालकासह एक महिला होती. या  रिक्षात  मी बसले. त्यानंतर सहप्रवाशी महिलेने  माझे बाळ पळवून नेले, असा बनाव रेश्माने रचला.

फुटेज अाणि श्वानाच्या मदतीने गुन्हा उघड
पोलिसांनी सांगितले, रेश्माच्या जबाबानुसार अाम्ही अाैंध रस्ता येथील शेवाळे हाॅस्पिटल ते बाेपाेडी यादरम्यानच्या दहा सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच या  मार्गावरील चर्च व हाॅटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली, तेव्हा रेश्मा बाळासह पायी जात असल्याचे त्यात दिसले. नंतर याच मार्गावरील  बाेपाेडी येथील एका हाॅटेलातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र तिच्या हाती बाळ दिसत नव्हते.
 
त्यामुळे पाेलिसांना संशय अाला. दरम्यान, बुधवारी रात्री रेश्माला ससून रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. पाेलिसांनी तिथे जाऊन श्वानपथकाला तिच्या अचाेढणीचा वास दिला. या श्वानाने बाेपाेडी चाैकापर्यंत माग काढला व तिथेच हे श्वान घुटमळले. त्यामुळे पाेलिसांचा संशय वाढला. पाेलिसांनी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर अटक करून तिच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...