आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरड काढण्याचे काम अंतिम टप्प्यात, पुणे-मुबंई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडाळा घाटात बोगद्याजवळ कोसळलेली दरड... - Divya Marathi
खंडाळा घाटात बोगद्याजवळ कोसळलेली दरड...
पुणे- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्याजवळ आज सकाळी मोठी दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, लोणावळ्याजवळील कार्ल्यात एकवीरा देवीच्या गडावर रविवारी मध्यरात्री दरड कोसळली आहे. यामध्ये विश्वस्त मंडळाचे कार्यालय व दर्शन बारींचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर, आज सकाळी भोरमधील मांढरदेवी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे तेथीलही वाहतूक ठप्प झाली आहे. दरड काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास दरड कोसळली. त्यात दोघेजण जखमी झाले असून पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पद्म जैन व नरेंद्र जैन अशी जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. पोलीस व आयआरबी कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.
दरम्यान, वाढत्या वाहनांची संख्या पाहता मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गाने वळविण्यात आली आहे. कोसळलेली दरड मोठी असून, द्रुतगती मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला होण्यास संध्याकाळपर्यंत वेळ लागेल, असे प्रशासनाने म्हटले आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूकही धिम्या गतीने सुरू आहे.
भिंत कोसळून नेरळमध्ये 5 ठार
रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळील नेरळ येथील मोहाचीवाडी येथे घराची भिंत कोसळून 5 जण ठार झाल्याची घटना घडली आहे. किसन दिघे, सुनंदा दिघे, स्वप्नेष दिघे, जाईबाई कदम, अर्चना दिघे अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. गेल्या 4 दिवसांपासून रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसानं उरण, अलिबाग, पेण परिसराला झोडपून काढले आहे. सलग सुरु असणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत.
दाभोळमध्ये दरड कोसळल्याने 3 जण अडकले-
रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळमध्ये दरड कोसळून या दरडीखाली दोन-तीनजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दाभोळ परिसरातील टेमकरवाडी येथे ही दरड कोसळली असून दरडीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रत्नागिरी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून सततच्या पावसाने दगड ठिसूळ होऊन येथे दरडी कोसळत असतात.
पुढे पाहा, दरड कोसळलेली छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...