आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘फ्रेंडशिप डे’लाच तीन मित्रांवर काळाचा घाला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर सोमाटणे फाट्यानजीक रविवारी पहाटे कंटेनर आणि कार यांची धडक होऊन कारमधील तीन मित्र जागीच ठार झाले. मृतांमध्ये तळेगावच्या माजी नगराध्यक्षा विजया भांडवलकर यांच्या मुलाचा मयूर, रवींद्र करंडे (24) आणि रोहित राजेश सेनगर (21, सर्व राहणार तळेगाव दाभाडे) यांचा समावेश आहे. मैत्रीचे बंध घट्ट करण्याचा आजचा दिवस या तीन मित्रांसाठी मात्र काळ होऊन आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबईहून पुण्याकडे येणारा कंटेनर (एमएच 06-एक्यू 4664) सोमाटणे फाट्याजवळच्या लडकत पेट्रोल पंपावर थांबला. तो पुण्याच्या दिशेने वळत असतानाच पुण्याहून तळेगावकडे भरधाव जाणा-या कारची (एमएच 12 -ईएक्स 6659) कंटेनरला धडक बसली. कार कंटेनरखाली घुसून हे तीनही मित्र जागीच मृत्युमुखी पडले. हे तिघेही त्यांच्या एका मित्राला विमानतळावर सोडण्यासाठी पुण्यात आले होते. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला होता.
अपघातांची मालिका - गेल्या आठवड्यापासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सलग दोन अपघात होऊन त्यात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ आता जुन्या महामार्गावरही अपघातांची मालिका सुरू झाल्याने हे महामार्ग मृत्यूचे सापळेच ठरत आहेत.