आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे महापालिकेत ‘शिस्तबद्ध’ भाजपच्या 2 गटांत ‘पारदर्शक’ हाणामारी, खुर्च्यांची फेकाफेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे महापालिकेतील सभागृह नेत्यांच्या दालनात भाजप कार्यकर्त्यांनी ताेडफाेड केली. - Divya Marathi
पुणे महापालिकेतील सभागृह नेत्यांच्या दालनात भाजप कार्यकर्त्यांनी ताेडफाेड केली.
पुणे - पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून उद‌्भवलेल्या  वादात भारतीय जनता पक्षाच्या दाेन गटांतील कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी तुंबळ हाणामारी झाली. यात महापालिकेतील भाजपच्या सभागृह नेत्यांच्या कार्यालयाचेही मोठे नुकसान झाले.    
 
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात भाजपला प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणेश बीडकर यांचा दारुण पराभव झाला तरी त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून पुन्हा संधी देण्यात अाली. या प्रकारामुळे भाजपचे दुसरे कार्यकर्ते गणेश घोष व त्यांच्या समर्थकांमध्ये संताप व्यक्त करण्यात अाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. 
 
स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज करण्याची मंगळवारी शेवटची मुदत होती. ९८ जागा जिंकून महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकाच्या तीन जागा मिळाल्या आहेत. या जागांसाठी भाजपमध्ये प्रचंड चुरस होती.

पराभूत उमेदवारांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी न देण्याचे पक्षाचे धोरण असल्याचे सांगितले जात होते. भाजपतर्फे माजी नगरसेवक गोपाळ चिंतल, रघु गौडा आणि गणेश घोष यांच्या नावांची घोषणा होण्याची अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात गणेश घोष यांच्याऐवजी गणेश बीडकर यांच्या नावाची शिफारस पक्षाने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वादाला तोंड फुटले. घोष यांच्या समर्थकांनी चिडून भाजप सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या कार्यालयात तोडफोड सुरू केली. या वेळी घोष यांनी स्वतःच्या डोक्यावर काच फोडून घेतल्याचे सांगण्यात येते. इतर कार्यकर्त्यांनी खुर्च्या व कुंड्यांची फेकाफेक केली.   
 
दरम्यान, या प्रकाराची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांना दिली आहे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे पुढील कारवाई होईल, असे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संध्याकाळी उशिरापर्यंत घोष, बीडकर या दोन्ही गटांनी पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. हा पक्षांतर्गत मुद्दा असून वरिष्ठांशी बोलून आम्ही तो निकाली काढू, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.  

दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले अाहेत. दाेन्ही गटांची समजूत काढून पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल हाेणार नाही याचीही ‘काळजी’ घेतली जात अाहे.

घटना निंदनीय, मनपाच्या नुकसानीची भरपाई भाजप देणार
‘अाज दुपारी पावणेतीनच्या सुमारास स्वीकृत सदस्यांची नावे वरिष्ठांकडून कळवण्यात आली. त्याप्रमाणे गोपाळ चिंतल, गणेश बीडकर, रघू गौडा या तिघांची नावे जाहीर करण्यात आली. यामुळे निराश इच्छुकांकडून ही घटना घडली असावी. झाला प्रकार निंदनीय आहे. यामुळे महापालिकेच्या मालमत्तेचे झालेले नुकसान भाजप स्वतःच्या खर्चातून भरून देईल.  
- मुक्ता टिळक, महापौर, पुणे.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोदी-फडणवीसांच्या फोटो समोर पडला खुर्च्यांचा खच 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...