आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: शाळा शुभारंभांच्या पुर्वसंध्येलाच महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आज अखेर शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे आदेश काढले आहेत. शिक्षण मंडळाचा यापुढील कारभार अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चालवण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेअंतर्गत शिक्षण समिती स्थापन करायची, की पुन्हा शिक्षण मंडळ स्थापन करायचे याचा निर्णय महापालिकेला घ्यावा लागणार आहे. लवकरच यासंदर्भातील प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे माडण्यात येण्याची शक्यता आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत असलेल्या शिक्षण मंडळांमध्ये गैरव्यवहार होत असल्याने शिक्षण मंडळे बरखास्त करावीत, असे आदेश दोन वर्षांपुर्वी एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने दिले होते. यासंदर्भातील निर्णय राज्य शासनाने घ्यावा, असेही या आदेशात नमूद करण्यात आले होते. विद्यमान महापालिका सभागृह अस्तित्वात असेपर्यंत स्वतंत्र शिक्षण मंडळ अस्तित्वात ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. 

यावर्षी फेब्रुवारीमध्ये पुणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर १५ मार्चला महापौर निवडीनंतर नवीन सभागृह अस्तित्वात आले. कायदेशीरदृष्टया त्याचवेळी शिक्षण मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आले होते. मात्र, तब्बल तीन महिन्यांनंतर आयुक्तांनी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पुर्वसंध्येला शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत.
 
शिक्षण मंडळाचा यापुढील कारभार प्राथमिक आणि माध्यमीक विभाग अशा दोन स्वतंत्र विभागाद्वारे अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि माध्यमीक शिक्षण अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणार आहे. शिक्षण मंडळाकडील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा समावेश महापालिकेमध्ये करण्यात येणार आहे. महापालिकेचे वेळोवेळी निघणारे आदेश त्यांच्यासाठी बंधनकारक राहाणार आहेत. यासंदर्भातील तांत्रीक तयारी यापुर्वीच सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, कार्यकर्त्यांच्या पुर्नवसनासाठी पुर्वीप्रमाणेच शिक्षण मंडळ असावे, यासाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नेते प्रयत्नशील आहेत. यासोबतच महापालिकेतील अन्य समित्यांप्रमाणेच नगरसेवकांचा समावेश असलेली शिक्षण समितीची स्थापना करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. नगरसेवकांची शिक्षण समिती स्थापन केल्यानंतरही खरेदीचे अधिकार हे स्थायी समितीकडेच असल्याने वेगळी शिक्षण समिती स्थापन करण्याऐवजी महिला व बालकल्याण समितीकडे शिक्षण विभाग सोपवावा, असाही मतप्रवाह भाजपच्या महापालिकेतील पदाधिकार्‍यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यासाठी प्रशासनाकडून लवकरच प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येईल, अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...