आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातेतील प्राचीन अनुबंधावर प्रकाश, तब्बल तेराशे वर्षांपूर्वीचा ताम्रपट आला उजेडात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - प्राचीन भारतातील मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन्ही प्रांतांत कशा प्रकारचे अनुबंध प्रचलित होते, यावर प्रकाश टाकणारा 1300 वर्षांपूर्वीचा ताम्रपट नुकताच उजेडात आला आहे. या निमित्ताने वेदांच्या काही अप्रचलित शाखा-प्रशाखांच्या परंपरांवरही नवा प्रकाशझोत पडणार आहे, कारण या ताम्रपटात यजुर्वेदाच्या वाराह शाखेचा स्पष्ट उल्लेख आहे.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे प्रभारी अभिरक्षक डॉ. श्रीनंद बापट यांनी ही माहिती दिली. हा ताम्रपट अमित लोमटे व अमित खिंवसरा यांच्या संग्रहात होता. मात्र, त्यावर मोठ्या प्रमाणात गंज लागला होता. भांडारकर संस्थेकडे तो स्वच्छ करण्यासाठी आला होता. रासायनिक प्रक्रियांद्वारे तो स्वच्छ करून वाचल्यावर ही नवी माहिती उजेडात आली, असे डॉ. बापट म्हणाले.

काय आहे ताम्रपटात?
प्रस्तुत ताम्रपट इ. स. 640 च्या वैशाख शुद्ध दशमीला म्हणजे गुरुवार, दिनांक 6 एप्रिल इ. स. 640 रोजी एक गाव दान देण्यात आले होते, अशी नोंद या ताम्रपटावर आहे. गुजरातेतील खेडा परिसरातील राधू या गावाजवळचे देवपरा हे गाव दान देण्यात आले होते. मैत्रक वंशाचा राजा दुसरा ध्रुवसेन याने हे गाव दान दिले होते. यजुर्वेदाच्या वाराह सूत्राच्या नागशर्मा आणि भद्रशर्मा या दोघांना हे दान देण्यात आले होते. मध्य प्रदेशातील मंदसौर येथून त्यांना मुद्दाम आणून गुजरातमध्ये खेडा येथे वसवण्यात आले, असे हा ताम्रपट सांगत असल्याचे या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

ताम्रपटाची वैशिष्ट्ये
०ताम्रपट दोन पत्र्यांचा आहे
० दोन्ही पत्रे एका कड्यात गुंफले आहेत
० एकूण 46 ओळींचा संस्कृत मजकूर आहे
० मजकूर किलकशीर्ष ब्राह्मी या लिपीत कोरलेला आहे.
० कडे तांबे आणि ब्राँझचे आहे.
० ताम्रपटाचे वजन प्रक्रियेनंतर 2707 ग्रॅम आहे.
० दोन्ही पत्रे प्रत्येकी 23 ओळींच्या मजकुराचे आहेत.
० पत्र्यांवर भरगच्च् मजकूर आहे.