आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Police Gives Permission To Rally Of Mns At Bank Of River

राज ठाकरेंची सभा नदीपात्रात घेण्यास पुणे पोलिसांची परवानगी, पण मनसेला \'SP\'च हवे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुण्यातील 9 तारखेच्या जाहीर सभेला पुणे पोलिसांनी डेक्कन पुलाखालील नदीपात्रात परवानगी दिली आहे. मात्र, मनसे एसपी कॉलेजच्या मोकळ्या प्रांगणासाठीच अडून बसली आहे.
नदीपात्रात येणारे लोक बसणार नाहीत, असे गणित मांडून नदीपात्रात सभा घेण्यास मनसे तयार नाही. पण शिक्षण प्रसारक मंडळीच्या एसपी कॉलेजने एकाही राजकीय पक्षाच्या सभांना मैदानावर सभा घेण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे पुण्यातील मनसे पदाधिकारी काय निर्णय घ्यावा या विवंचनेत आहेत. कारण सभेसाठी आता केवळ 48 तासच शिल्लक राहिले असून, मनसे पदाधिका-यांना आज किंवा उद्या सकाळपर्यंत सभा कोठे घेणार याचे उत्तर पुणे पोलिसांना द्यावे लागणार आहे.
पुण्यातील मनसेच्या पदाधिका-यांना राज यांची सभा जंगी करायची आहे. मोदींच्या सभेला तोडीस तोड अशी महासभा घ्यायची आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळणार आहे, याबाबत पदाधिकारी निश्चिंत आहे. पण ही अतिविराट सभा घ्यायची कोठे, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. त्यासाठी त्यांनी अलका चौक किंवा एसपी कॉलेजचे मैदानात परवानगी मिळावी म्हणून अर्ज केले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, वाहतूक कोंडी करणा-या मुख्य चौकात, रस्त्यात राजकीय पक्षांच्या सभांना परवानगी देता येत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी अलका चौकात सभा घेण्यास परवानगी देणे केवळ अशक्य असल्याचे कळविले होते.
त्यानंतर मनसे एसपी कॉलेजसाठी अडून बसली. मात्र त्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे मैदान उपलब्ध करून देण्यास नकार दिला आहे. सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदींची पुण्यात सभा झाली होती. त्यावेळी शहर भाजपने एसपी कॉलेजकडे मागणी केली होती. त्यावेळीही त्यांनी भाजपला नकार दिला होता. त्यामुळे राज यांच्या सभेला एसपीची परवानगी देण्याची जराही शक्यता नाही. त्यामुळे मनसेला नदीपात्रात सभा घेण्यावाचून पर्याय उरलेला नाही.
उन्हाळ्याची चाहूल लागल्याने नदीपात्रात सध्या कसलाही चिखल नाही. त्यामुळे तेथे भरपूर मोकळी जागा उपलब्ध आहे. हजारो लोक तेथे बसू शकतात असे पोलिसांचा युक्तिवाद आहे. विशेष म्हणजे तेथे याआधी भाजप, मनसेच्या मोठ्या सभा पार पडल्या आहेत. अशा वेळी मनसेला नदीपात्रात सभा घेण्यास काय अडचण आहे हा सवाल पोलिसांना पडला आहे. जे मैदान मिळणे अशक्य असल्याचे सांगितल्यानंतरही त्याच एसपीसाठी मनसेने अडून बसणे म्हणजे हा प्रसिद्धीचा स्टंट आहे, अशी टीका होऊ लागली आहे. त्यामुळे मनसेला उद्यापर्यंत सभेचे ठिकाण ठरवावे लागणार, आणि तसे पोलिसांना कळवावे लागणार आहे. आता मनसेची नदीपात्रातच सभा होणार हे जवळपास नक्की असून, मनसेचे पदाधिकारी पुणे पोलिसांना याबाबत कधी कळविणार याकडे उत्सुकता लागली आहे.