आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाभोलकर हत्या प्रकरणी पुण्यातील कुख्यात गुंड सुपारी किलरचा शोध सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी अद्याप हाती लागले नसल्याने टीकेचे धनी बनलेल्या पुणे पोलिसांनी सर्व शक्यतांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. आजवर 1200 जणांची चौकशी करण्यात आली आहे. आता पुण्यातील सुपरी किलर्सची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून अट्टल गुंडांच्याही ‘कुंडल्या’ तपासल्या जात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दाभोलकर यांची हत्या अत्यंत नियोजनबद्धरित्या करण्यात आली असून कोणतेही पुरावे अथवा धागेदोरे आरोपींनी मागे सोडलेले नसल्याने पोलिसांना तपास करणे कठीण झाले आहे. हत्या करतेवेळी लॉक झालेल्या पिस्टल मधील दोन गोळया व्यवस्थित बाजूला करत त्यांनी गोळीबार केल्याचे समोर आले आहे. तसेच पळून जाताना सीसीटीव्ही चेहरे स्पष्ट दिसणारा नाहीत याची काळजीही आरोपींनी घेतलेली दिसते. यावरून एखाद्या व्यावसायिक मारेकर्‍याने किंवा शार्पशूटरनेच हा खून केला असावा, या संशयापर्यंत पोलिस आले आहेत.

आरोपींनी दाभोलकर यांची हत्या करण्यापूर्वी घटनास्थळावरून कोणाशी मोबाइलवरून संभाषण केले आहे काय? याचीही तपासणी पोलिसांनी केली. याकरिता तज्ज्ञांचे मार्गदर्शनही घेतले, मात्र त्यातही पोलिसांच्या हाती काहीच ठोस पुरावे लागलेले नाहीत. या घटनेला आठवडा उलटला तरी अद्याप ठोस निष्कर्षापर्यंत न आल्याने पोलिसांवर आता सर्वच स्तरातून टीका होत आहे.

राकेश मारियांकडून आढावा
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी सोमवारी पुण्यात येऊन डॉ.दाभोलकर खून खटल्याच्या तपासाचा आढावा घेतला. पोलिस आयुक्त गुलाब पोळ, सहपोलीस आयुक्त संजीवकुमार सिंघल, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) शहाजी सोळुंके, पोलीस उपायुक्त (गुन्हे) राजेश बनसोडे. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे व एटीएसचे वरिष्ठ अधिकारी संजय लाटकर यांच्यासोबत त्यांनी विशेष बैठकही घेतली. मारिया यांनी सुमारे चार तास अधिकार्‍यांची बैठक घेतल्यानंतर सांगितले की, सदर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु असून स्थानिक पोलिसांना तपासात आम्ही मदत करत आहोत.
मुख्यमंत्र्यांकडून कानउघाडणी
हल्लेखोर अजूनही मोकाटच असल्याने तपास यंत्रणाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. आरोपी सीसीटीव्हीत आढळून आले असले तरी त्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसत नाही. तसेच हल्लेखोरांची मोटारसायकलही आढळून येत नाही. या पार्श्वभूमीवर रविवारी पुण्यात आलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची एक बैठक घेऊन त्यांची कानउघाडणी केल्याचे सांगितले जाते. गणेशोत्सवापूर्वी या घटनेचा तपास पूर्ण करण्यात यावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. याकरिता दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख राकेश मारिया यांना तपासात लक्ष घालण्यास सांगितले आहे.