आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात विसर्जन समाप्त, बाप्‍पांना भक्तीभावाने पुण्‍यनगरीने दिला निरोप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- लाडक्‍या गणरायाला पुण्‍यनगरीने भक्तीभावाने निरोप दिला. गणपती बाप्‍पांची विसर्जन मिरवणूक आज समाप्‍त झाली. दुपारी 1.30 वाजताच्‍या सुमारास अखेरच्‍या सार्वजनिक गणेशाचे विसर्जन झाले. बिब्‍वेवाडीच्‍या ज्‍वाला मित्र मंडळाचा गणपतीचे सर्वात शेवटी विसर्जन करण्‍यात आले. विसर्जन मिरवणूक अंतिम टप्‍प्‍यात आली असताना पोलिसांनी मंडळाच्‍या कार्यकर्त्‍यांना घाई केली. कार्यकर्त्‍यांनी नाराजी व्‍यक्त केल्‍यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. त्‍यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता. मिरवणूक संपल्‍यानंतर सर्व रस्‍ते टप्‍प्‍याटप्‍प्‍याने वाहतुकीसाठी खुले करण्‍यात आले.

मुसळधार पावसाने अडथळे आणल्‍यानंतरही पुण्‍यात भाविकांचा उत्‍साह कमी झाला नाही. काही काळ मिरवणुकीचा खोळंबा झाला होता. परंतु, पाऊस थांबताच पुन्‍हा जल्‍लोषात मिरवणूक सुरु झाली. आज (गुरुवार) सकाळी बाप्‍पांच्‍या विसर्जनासाठी उत्‍साह दिसून आला. गेल्‍या अनेक वर्षांमध्‍ये प्रथमच विसर्जनाला मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे मुठा नदीतील पाण्‍याची पातळीही वाढली होती. त्‍यामुळे सावधगीरी बाळगण्‍यात आली. दरम्‍यान, पुण्‍यातील मिरवणूक आता अंतिम टप्‍प्‍यात आली आहे. लक्ष्‍मी रस्‍त्‍यावरील मिरवणूक सकाळी 11 वाजता संपली. त्‍यानंतर रस्‍ता वाहतूकीसाठी खुला करण्‍यात आला. महापालिकेचे कर्मचारी रस्‍त्‍याची स्‍वच्‍छता करण्‍याच्‍या कामात गुंतले. पोलिसांनीही बॅरिकेट्स काढून टप्‍प्‍याटप्‍प्‍याने वाहतूक सुरु केली. लक्ष्‍मी रस्‍त्यावरुन शिवराज मंडळ भोंडेआळी हा गणपती मिरवणुकीतील शेवटचा होता. त्‍यानंतर आता अलका टॉकीज चौक आणि टि‍ळक रस्‍त्‍यावर मिरवणूक सुरु आहे.

सकाळी 6 वाजेपर्यंत 85 मंडळांच्‍या गणेशाचे विसर्जन झाले होते. त्‍यानंतर 10 वाजेपर्यंत 100 मंडळाच्‍या गणेशाचे विसर्जन झाले.

भाऊ रंगारी गणेश मंडळाचा गणपती आज (गुरुवार) सकाळी 2 वाजून 30 मिनिटांनी अलका चौकात आला. त्यानंतर उपमहापौर बंडू गायकवाड यांनी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांना व्यासपिठावरून खाली उतरून मानाचे श्रीफळ दिले. काही वेळाने गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्या पाठोपाठ मंडई गणपतीचे अलका चौकात आगमन झाले. त्या मंडळाच्या अध्यक्षांनाही गायकवाड यांनी मानाचे श्रीफळ दिले. त्याचेही काही वेळाने विसर्जन करण्यात आले. त्यानंतर सर्वांची उत्सुकता ताणून धरणारा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाचा गणपती सुमारे 3 वाजता अलका चौकात आला. त्यानंतर त्याचे 3.15 वाजता विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच दगडूशेठ गणपती मध्यरात्रीच्या सुमारास अलका चौकातून मार्गस्थ झाला. गेल्या वर्षी तो सकाळी सुमारे 7 च्या सुमारास अलका चौकात आला होता.

पुण्यातील विसर्जन मिरवणूक उत्साहात सुरू झाल्यानंतर दुपारी आणि सायंकाळी बऱ्याच वेळा वरूण राजाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे पुण्यातील धरणांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त साठा झाला. मध्यरात्रीच्या सुमारास नदीत अतिरिक्त पाणी सोडण्यात आले. त्‍यामुळे पाण्‍याची पातळी वाढली होती.

लाडक्‍या गणरायाची विसर्जन मिरवणूक उत्‍साहात काढण्‍यात आली. मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक सकाळी 9.40 वाजता सुरु झाली. कसबा गणपती टिळक पुतळ्याकडे मार्गस्‍थ झाल्‍यानंतर तांबडी जोगेश्‍वरी गणपतीचीही मिरवणूक सुरु झाली. चांदीच्‍या पालखीत मोठ्या थाटात बाप्‍पा टिळक पुतळ्याकडे मार्गस्‍थ झाले. त्‍यानंतर मानाचे पाचही गणपती विसर्जनासाठी थाटात रवाना झाले. ढोलताशांच्‍या गजरात मिरवणुकीत अतिशय जल्‍लोषाचे वातावरण निर्माण झाले. मानाचे पाचही गणपती अलका टॉकीज चौकातून पुढे गेल्‍यानंतर सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांचे आगमन सुरु झाले. सायंकाळी विद्युत रोषणाईमध्‍ये मिरवणुकांचे सौदर्य अधिकच खुलून गेले. हे विहंगम दृष्‍य हजारो नेत्रांनी साठवून ठेवले.

PICS : पुण्यात विसर्जन मिरवणुकीवर बरसल्या जलधारा, भाविक भिजले चिंब

PHOTOS : ढोल-ताशांच्या गजरात बाप्पा निघाले

पाहा पुण्यातील श्रींच्या विसर्जन मिरवणूकीतील विविध रंग

रात्री १०.४० पर्यंत २७ गणपती मंडळ अलका टॉकीज चौकातून पुढे मार्गस्थ. रात्री १२.०० नंतर डीजे आणि ढोल-ताशे बंद. सकाळी सहा वाजल्यानंतर पुन्हा सुरु होणार.

रात्री 8.05- पावसामुळे दगडूशेठ हलवाई गणेशाची विसर्जन मिरवणूक उशीरा सुरु होणार

रात्री 8- पावसामुळे सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक खोळंबली

सायंकाळी 7.30- नादब्रह्मतर्फे ढोलताशाचे जोरदार सादरीकरण

सायंकाळी 7.20- पुण्‍यात पुन्‍हा मुसळधार पावसाला सुरुवात

सायंकाळी 6.40- मानाच्‍या पाचव्‍या गणपतीचे विसर्जन

सायकाळी 6.10- मानाच्‍या चार गणपतींचे विसर्जन

सायंकाळी 6- मानाचे पाचही गणपती अलका टॉकीज चौकातून पुढे मार्गस्‍थ

सायंकाळी 5.40- मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती अलका टॉकीज चौकात दाखल.

सायंकाळी 5.10 - मानाचा चौथा तुळशीबाग गणपती अलका टॉकीज चौकात दाखल

दुपारी 5.00 - मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती अलका टॉकीज चौकात दाखल

दुपारी 4.05 - पावसाची दमदार हजेरी

दुपारी 3.55- नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांचे गुरुजी तालीम गणपतीसमोर संचलन.

दुपारी 3- महापौर चंचला कोद्रे यांनी कसबा गणपती मंडळाच्‍या अध्‍यक्षांचा श्रीफळ देऊन सत्‍कार केला.

दुपारी 2.50- मानाचा दुसरा तांबडी जोगेश्‍वरी गणपती अलका टॉकिज चौकात दाखल

दुपारी 2.10- मानाचा पहिला गणपती नियोजित वेळेच्‍या तासभर आधी पोहोचल्‍यामुळे महापौरांनी केले अभिनंदन

दुपारी 1.40- मानाचा पहिला गणपती अलका टॉकीज चौकाजवळ दाखल

दुपारी 1- मानाचे पाचही गणपती लक्ष्‍मी रस्‍त्‍यावरुन मार्गस्‍थ

दुपारी 12.52- पुण्‍यात तुरळक पाऊस

दुपारी 12.50- मानाचा पहिला गणपती शगुन चौकात

दुपारी 12- मानाचे 3 गणपती लक्ष्‍मी रस्‍त्यावर मार्गस्‍थ, चौथा गणपती बेलबाग चौकात

सकाळी 11.40- मानाचा पहिला कसबा गणपती बेलबाग चौकात

सकाळी 10.20- मानाचा पहिला कसबा गणपतीची उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या हस्‍ते पुजा, महापौर चंद्रकला कोद्रे यांची उपस्थिती

सकाळी 10.10 - पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि फुलांनी सजवलेला सुंदर मनमोहक नक्षीदार रथातून गुरुजी तालीम गणेश मंडळाचे प्रस्थान

सकाळी 10.05- तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीम गणपती फुलांच्‍या रथावर स्‍वार, टिळक पुतळ्याकडे मार्गस्‍थ

सकाळी 9.50- तांबडी जोगेश्‍वरील गणपती चांदीच्‍या पालखीत मार्गस्‍थ

सकाळी 9.40 - मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरु

PHOTOS : ढोल-ताशांच्या गजरात बाप्पा निघाले