आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीयेलाही पुणे बंदच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानल्या जाणार्‍या अक्षय्य तृतीयेच्या दिवशीही सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला आहे. त्यामुळे शुभमुहूर्तावर खरेदी करण्याचे ग्राहकराजाचे स्वप्न भंगले आहे. एरवी या मुहूर्तावर दागिने, वाहन, घर अथवा अन्य गृहोपयोगी वस्तू खरेदी करणार्‍या ग्राहकांनी गजबजणारी बाजारपेठ सुनी राहण्याची चिन्हे आहेत.

स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात व्यापारी महासंघांनी सुरू केलेल्या बेमुदत बंदचा रविवारी पाचवा दिवस होता. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, खजिनदार फत्तेचंद रांका, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांच्यासह महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी रविवारी पत्रकार परिषदेत बंद कायम राहणार असल्याची माहिती दिली. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तरी बाजारपेठा सुरू राहतील, ही ग्राहकांची आशा त्यामुळे फोल ठरली आहे.

राज्य सरकार एलबीटीबाबत फक्त समित्या नेमत आहे. पण एलबीटीचा तिढा सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका मात्र घेत नाही. व्यापार्‍यांनी जनतेला वेठीस धरू नये, असे सांगून जनतेचीच दिशाभूल सरकार करत आहे.

राज्यातील सर्व प्रमुख बाजारपेठा, तसेच व्यापारी या बेमुदत बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत, असे ओस्तवाल आणि रांका यांनी सांगितले. एलबीटीबाबत शासनाने नेमलेल्या समितीमध्ये लोकप्रतिनिधी तसेच ग्राहकांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.

दुकाने 5 दिवसांपासून ठप्प
बेमुदत बंदमुळे गेल्या पाच दिवसांपासून सराफ, कापड, टिंबर, पेपर, स्टेशनरी, स्टील, पुणे र्मचंटस चेंबर, आयर्न, मशिनरी, इलेक्ट्रिक, होलसेल, केमिकल, कटलरी, ग्राहकपेठ, प्लायवूड, हार्डवेअर, ऑटोमोबाईल, सिमेंट, पेंट आदी सर्व बाजारपेठा ठप्प आहेत.