आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्याच्या तोंडावर पुन्हा हुडहुडी;पुण्यातही नीचांकी तापमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आठवडाभरापासून पार्‍याची चढती कमान सरासरी तीन ते चार अंशांनी घटली असून, राज्यभर पुन्हा हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. शनिवारी पुण्यात 8.9 सेल्सियस इतकी नीचांकी तापमानाची नोंद झाली. विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचीही नोंद झाली.

उन्हाळ्याची चाहूल लागण्याची चिन्हे असतानाच पारा एकदम 10 अंशांच्या खाली गेला आहे. दोन दिवसांपूर्वी तर अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटही झाली. गुरुवारपर्यंत 17 ते 19 अंशांदरम्यान असणार्‍या पार्‍याने शुक्रवारी-शनिवारी एकदम रंग बदलले. विदर्भात तसेच पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पारा दहा अंशांच्या खाली घसरल्याची नोंद पुणे वेधशाळेत आहे.

राज्यात आठवडाभरात अनुभवास येणारे हवामानातील तीव्र बदल दोन प्रकारचे आहेत. काही ठिकाणी स्थानिक घटक कारणीभूत ठरले आहेत, तर बर्‍याच ठिकाणी उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांचा अनियमितपणा कारणीभूत ठरला आहे, असे हवामान विभागाच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांनी सांगितले. विदर्भाच्या तापमानात उल्लेखनीय घट, तर मराठवाड्यातही लक्षणीय घट आढळून येत आहे. राज्यातील कमाल तापमानातही तीव्र चढ-उतार दिसत आहेत. ही स्थिती पुढील 48 तास कायम राहण्याची शक्यता आहे, असेही त्या म्हणाल्या.