आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठांतील अध्यासनांसाठी वार्षिक अहवाल सक्तीचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - विद्यापीठे आणि समाज यांच्यात थेट दुवा जोडण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली विद्यापीठांमधील अध्यासने नेमके काय काम करतात, निधीचा विनियोग कसा करतात या प्रश्नांची उत्तरे आता विविध अध्यासनांना दरवर्षी द्यावी लागणार आहेत. व्यवस्थापन परिषदेने या अध्यासनांनी आता वार्षिक अहवाल दिले पाहिजेत, असा निर्णय घेतला असून तो सक्तीचा करण्यात येणार आहे.
राज्यांतील विद्यापीठांत अनेक अध्यासने कार्यरत आहेत. मात्र, त्यांना कोणतीच नियमावली नसल्याने त्यांच्यात सावळागोंधळ दिसून येतो. केवळ हितसंबंध जपण्यासाठीच ही अध्यासने सुरू करण्यात आली असून त्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाचा कोणताही तपशील सहज उपलब्ध होत नाही, अशीही चर्चा आहे. माध्यमांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या मुद्दय़ावर बरीच कारणमीमांसा करण्यात आली. हे प्रकरण थेट विद्यापीठ अनुदान आयोगापर्यंत पोहोचल्याने अध्यासनांच्याबाबत यूजीसीनेही काही सूचना केल्या. त्यानुसार आता अध्यासनांनी वार्षिक अहवाल देणे बंधनकारक केले आहे. यूजीसीने अध्यासनांसाठीच्या सूचना जारी केल्या असून त्यामुळे अध्यासनांच्या कामात सुसूत्रता येणार आहे.
ही आहेत प्रमुख अध्यासने
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, जोतिबा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, पं. भीमसेन जोशी, शंतनुराव किलरेस्कर इत्यादी महापुरुषांच्या कार्याचा, त्यांच्या योगदानाचा गौरव करणे व त्यांच्यापासून प्रेरणा घेणे, यासाठी अध्यासनांची स्थापना विद्यापीठांत करण्यात आली. त्यांच्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली असून तज्ज्ञ मंडळींची नेमणूकही करण्यात आली आहे.
यूजीसीच्या सूचना
अध्यासनांच्या कामकाजासाठी स्वतंत्र समिती नेमावी
अध्यासनांनी वार्षिक अहवाल देणे बंधनकारक
अध्यासनांच्या कामाचे दरवर्षी मूल्यमापन
मंजूर निधीच्या विनियोगाचा हिशेब
दैनंदिन कामासाठी स्वतंत्र नियमावली
अध्यासनांमधील संशोधन प्रकाशित करावे.
चर्चेअंती घेतलेला निर्णय
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांनुसार राज्यातील सर्वच विद्यापीठांतील अध्यासनांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. व्यवस्थापन परिषदेने अध्यासनांच्या कामाचा अहवाल तयार केला आहे. त्यावर चर्चा होऊन हे निर्णय घेण्यात आले आहेत.
अरुण अडसूळ, व्यवस्थापन परिषद सदस्य, पुणे विद्यापीठ
नियमावली तयार, व्यवस्थापन परिषदेचा निर्णय