आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे विद्यापीठाचे बहि:स्थ प्रवेश बंद, मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवर दूरशिक्षण पद्धती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बहि:स्थ शिक्षण पद्धती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून बहि:स्थ अभ्यासक्रमास नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची निराशा हाेणार अाहे. त्यांना अाता मुक्त विद्यापीठाप्रमाणेच सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण प्रणालीनुसार दूरस्थ अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा लागणार आहे.

विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांची वाढती संख्या, विद्यार्थ्यांची वाढती संख्या, त्यांच्या परीक्षा घेण्यापासून ते सर्वच शैक्षणिक बाबींवर नियंत्रण आणि गुणवत्ता टिकवण्याच्या नावाखाली सावित्रीबाई फुले विद्यापीठाने यंदापासून बहि:स्थ शिक्षण पद्धतीच बंद केली. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवरच दूरस्थ शिक्षण पद्धती सुरू करण्याचा निर्णय घेतला. आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेल्या किंवा इतर कारणास्तव फुले विद्यापीठाचीच नियमित पदवी घेण्याची इच्छा असतानाही ती घेता येत नसलेले विद्यार्थीच बहि:स्थ पद्धतीने शिक्षण घेतात. परंतु आता या विद्यार्थ्यांना दूरस्थ प्रणालीद्वारेच शिक्षण घ्यावे लागणार आहे. याबाबत काही विद्यार्थ्यांनी नाराजीही व्यक्त केली असून दूरस्थ प्रणालीद्वारेच शिक्षण घ्यावयाचे असल्यास मुक्त विद्यापीठाचा पर्याय आहेच. त्यामुळे पुणे विद्यापीठाने ही प्रणाली सुरू करणे योग्य नसल्याचेही मत विद्यार्थ्यांसह काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
स्वतंत्र विभाग राहणार - दूरस्थ शिक्षण प्रणालीचा स्वतंत्र विभाग कार्यरत राहणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रमांपासून ते परीक्षा घेण्यापर्यंत सर्वच बाबीही स्वतंत्र घेतल्या जातील.
क्रेडिट सिस्टिम राहणार - राष्ट्रीय आणि अांतरराष्ट्रीय स्तरावर इतर विद्यापीठांशी समन्वय साधता यावा यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सावित्रीबाई फुले विद्यापीठाने नियमित पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना क्रेडिट सिस्टिम लागू केली आहे. त्याच धर्तीवर दूरस्थ प्रणालीलाही क्रेडिट सिस्टिम लागू केली जाणार आहे.

तिन्ही जिल्ह्यांत सुरुवातीस १० केंद्रे - सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांत सुरुवातीस १० अभ्यास केंद्रे सुरू केली जाणार आहेत.
३० हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची शक्यता - आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवीच्या पहिल्या वर्षासाठी आणि पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षासाठी मिळून ३० हजार विद्यार्थी प्रवेश अंदाज आहे.
बातम्या आणखी आहेत...