आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Puneite Missing Chance To See Prisoner Actor Sanjay Dutta

कैदी अभिनेता संजय दत्त याला पाहण्याची पुणेकरांची संधी हुकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्‍ट्र राज्य कारागृह विभागाच्या वतीने येरवडा मध्यवर्ती तुरुंगातील बंदिजनांच्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बालगंधर्व रंगमंदिरात गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे हा पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती कारागृहाच्या अपर पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी दिली. त्यामुळे येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी असलेला कैदी अभिनेता संजय दत्त याला पाहण्याची पुणेकरांची संधी हुकली आहे.


बोरवणकर म्हणाल्या, कार्यक्रमासाठी मागील दोन महिन्यांपासून कारागृह अधिकारी, कर्मचारी व कैद्यांनी परिश्रम घेतले होते. एकूण 51 कैद्यांनी यासाठी कसून तयारी केली होती. यात संजय दत्त याचाही समावेश आहे. हा कार्यक्रम एकटा संजय दत्त या कैद्याचा नसून त्यात इतर कैदीही सहभागी आहेत. प्रसारमाध्यमांनी संजयच्या सहभागाला अधिक प्रसिद्धी देऊन चर्चेत आणले. महाराष्‍ट्राची संस्कृती, सण, उत्सव व संगीत यावर हा कार्यक्रम आधारित होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री व गृहराज्यमंत्री उपस्थित राहणार होते. यासाठी व्हीआयपी, तुरुंग अधिकारी व कैद्यांचे नातेवाईक यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. तसेच कार्यक्रमासाठी एक हजार तिकीट दर ठेवण्यात
आला होता. प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिल्याने सर्व तिकीट विक्री झाली होती. मात्र, आता कार्यक्रम रद्द झाल्याने प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे पुन्हा दिले जातील.