आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामे पूर्ण नसतानाही राष्ट्रवादीकडून पुण्यातील नेहरू स्टेडियमच्या उद्घाटनाचा घाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- स्वारगेट येथील पंडीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमचे काम पूर्ण झाले नसतानाही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्‌घाटनाचा घाट घातला असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी केला आहे. महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा कार्यकाळ संपत आला असल्याने अपूर्ण काम असतानाच उद्घाटनाची घाई केली जात असल्याचे बोलले जात आहे.
पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या नेहरू स्टेडियमच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्टीचे सध्या काम सुरु आहे. या खेळपट्टीचे बहुतेक काम झाले आहे. मात्र काही छोटी-मोठी कामे बाकी आहेत. मात्र, त्यापूर्वीच या स्टेडियमवर पुणे महापौर चषक अंतर्गत महापौर संघ व महापालिका आयुक्त संघ या क्रिकेट सामन्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचदरम्यान, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्टीचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. येत्या शनिवारी ( 24 ऑक्टोबर) भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे यांच्या हस्ते या खेळपट्टीचे उद्घाटन केले जाणार आहे. मात्र या ठिकाणाची बरीच कामे अर्धवट असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
नगरसेवक बालगुडे म्हणाले, पुण्यातील मध्यवस्तीतील नेहरू स्टेडियमकडे मागील अनेक वर्षे दुर्लक्ष झाले होते. गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय स्टेडियम झाल्यापासून नेहरू स्टेडियम अडगळीत पडले आहे. मात्र, मुलांना सरावासाठी येथे दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत तसेच स्थानिक स्पर्धा या ठिकाणी व्हाव्यात म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार करावी यासाठी अडीच कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्या धर्तीवर या स्टेडियमची सध्या डागडुजी केली जात आहे. नेहरू स्टेडियमवर अजूनही काही विकासकामे बाकी आहेत. त्यामुळे या खेळपट्टीच्या उद्घाटनाचा घाट महापौरांनी आताच घालू नये अशी मागणी त्यांनी केली.
नेहरू स्टेडियमवरील काही कामे अर्धवट आहेत. ती सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यावा. आता घाई घाईने उद्घाटन करण्याची गरज नाही. धनकवडे यांचा महापौरपदाचा कालावधी संपत आल्याने जर ही लगीनघाई होणार असेल तर त्याला काँग्रेसचा विरोध आहे. चंदू बोर्डे हे एक महाराष्ट्राचे महान खेळाडू राहिले आहेत. त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचा आम्हाला आनंदच आहे. पण श्रेयवादासाठी घाईगडबडीने उद्घाटनाचा घाट घातला असेल तर त्याला आमचा विरोध राहील असेही बालगुडे यांनी सांगितले. जर कामे अपूर्ण असतील तर उद्घाटन करणे उचित नसल्याचे काँग्रेसचे नेते व उपमहापौर आबा बागूल यांनी म्हटले आहे.