आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धन्य आज दिन : पंढरीच्या वाटेवरील वैष्णवांची सेवा करण्‍यात पुणेकर रमले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पंढरीच्या वाटेवरच्या वैष्णवांची सेवा करून पुण्य जोडण्याची लगबग मंगळवारी पुण्यात होती. वारक-यांची सोय करण्यासाठी शासकीय, खासगी, स्वयंसेवी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कॉर्पोरेट मंडळींचीही घाई सुरू होती.
आषाढी वारीसाठी निघालेला लक्षावधी वारक-यांचा मेळा संत ज्ञानेश्वर आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सोमवारपासून पुण्यात मुक्कामाला आहे. शहरातील अनेक मंदिरे, सभागृह, शाळा, यात्रानिवासांत वारक-यांची सेवा सुरू आहे. त्यांच्यासाठी चहा, भोजन, फराळ निवास आदी सुविधा पुरवल्या जात आहेत. याशिवाय चप्पल दुरुस्ती, हजामत याही सेवा देण्यात आल्या.


दोन्ही पालख्यांचे आज पंढरीकडे प्रस्थान
बुधवारी सकाळी संत ज्ञानेश्वर आणि तुकोबा यांच्या पालख्यांची वाटचाल पंढरीच्या दिशेने सुरू होणार आहे. माउलींची पालखी दिवेघाटातून सासवड मुक्कामी जाईल, तर तुकोबांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणी काळभोरला पोहोचेल. माउलींच्या पालखीच्या वाटचालीतला सर्वांत अवघड टप्पा पुणे ते सासवड असा आहे. सुमारे 25 किलोमीटरचा हा टप्पा घाटातून जात असल्याने चढणीचा रस्ता आहे.


24 सोनसाखळी चोर जेरबंद
भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोरी करणा-या 24 जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सदर आरोपींत 20 पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी रस्त्यावर म्हस्के वस्ती येथे आली असता माधवी सूर्यकांत पाटील या महिलेच्या गळ्यातील 25 हजार रुपयांची सोनसाखळी आरोपीने लंपास केली. ही बाब लक्षात येताच पाटील यांना आरडाओरड केल्याने ज्ञानेश्वर राजधर माळी (वय 28, रा. नांदेड) या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पालखीतील सोनसाखळी चो-या रोखण्यासाठी गुन्हे शाखेतर्फे सराईत गुन्हेगारांना ओळखणा-या विशेष पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात आहे.