आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Punjab CM Prakashsing Badal Sant Namdeo National Award

राजकारण ‘जवानी’वर नव्हे तर ‘जज्बा- तजुर्बा’वर चालते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरस्कार वितरण कार्यक्रमात राज ठाकरे, प्रकाशसिंह बादल व मुख्यमंत्री फडणवीस. - Divya Marathi
पुरस्कार वितरण कार्यक्रमात राज ठाकरे, प्रकाशसिंह बादल व मुख्यमंत्री फडणवीस.
पुणे - चव्वेचाळीस वर्षे वयाच्या देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ८९ वर्षीय देशातील सर्वात वृद्ध मुख्यमंत्र्यांचा होणारा गौरव सोहळा पुण्याने बुधवारी अनुभवला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांना ‘संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गाैरवण्यात अाले. ‘राजनीति में अकेले जवानी से काम नहीं चलता; जज्बा चाहिए, तजुर्बा भी चाहिए,’ अशी मिश्कील प्रतिक्रिया बादल यांनी सत्कारानंतर व्यक्त केली.

‘सरहद’च्या वतीने हा पुरस्कार देण्यात अाला. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार यांनी प्रास्ताविक केले. ‘पुरस्काराच्या निमित्ताने तीन दिवस मी पुण्यात राहिलो. माझ्या आयुष्यातील हे ‘बेस्ट डेज’ आहेत. महाराष्ट्रातून खूप काही शिकून मी परत निघालोय,’ या शब्दांत बादल यांनी महाराष्ट्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भरगच्च सभागृहात रंगलेल्या या सोहळ्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे होते. ठाकरे यांनी मराठीतच केलेल्या छोटेखानी भाषणाला श्रोत्यांकडून वारंवार टाळ्यांची साथ मिळत गेली. टाळ्यांचा कडकडाट झाला की ठाकरे काय बोलले, याची उत्सुकता बादल दाखवत. अर्थातच त्यामुळे बादल यांच्या शेजारी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना ठाकरेंचे भाषण संपेपर्यंत दुभाष्याची भूमिका बजावावी लागली.
‘पावसाळ्याच्या तोंडावर महाराष्ट्रात ‘बादल’ येत आहेत, हा छान योगायोग अाहे,’ अशी टिप्पणी करत ‘किमान त्यांच्यामुळे तरी महाराष्ट्रातील दुष्काळ दूर होवो’, अशी इच्छा राज ठाकरेंनी व्यक्त केली. ‘पहिल्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यावर बादल यांनी पंजाबी भाषेचा आग्रह धरला होता. त्या वेळी बादल हिंदीला विरोध करतात म्हणून तेव्हाच्या जनसंघाने त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारले होते. माझेही तेच मत आहे. प्रत्येक राज्याला आपल्या भाषेचे प्रेम असायलाच हवे. शीख महाराष्ट्रात आले. त्यांनी इथल्या मातीशी इमान राखले. इथे येऊन स्वत:चे मतदारसंघ बांधण्याचे उद्योग त्यांनी केले नाहीत,’ असा टाेलाही ठाकरे यांनी लगावला. ‘सातशे वर्षांपूर्वी संत नामदेवांनी पंजाबात जाऊन नाते निर्माण केले. प्रेमाचा धागा जोडण्याचे हे काम एक शिंपीच करू शकतो’, असे ते म्हणाले.
नामदेवांसमाेर नतमस्तक
बादल यांनी मराठी बोलता येत नसल्याबद्दल सुरुवातीलाच क्षमा मागितली. ‘संत नामदेवांच्या नावाचा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. प्रत्येक शीख गुरुग्रंथसाहिबसमोर नतमस्तक होतो. आमच्या पवित्र ग्रंथात नामदेवांची गुरुबाणी आहे. याचाच अर्थ आम्ही नामदेवांपुढेही झुकतो. महाराष्ट्र आणि पंजाबचा धार्मिक संबंध आहे. नामदेव वीस वर्षे पंजाबात राहिले. लोकांना परमात्म्याशी जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. संत नामदेवांचे काम दीपस्तंभासारखे आहे. सर्वधर्मसमभाव आणि बंधुभावाची नामदेवांची शिकवण आजच्या काळात देशाला एकत्र ठेवण्यासाठी आवश्यक अाहे,’ असे मतही बादल यांनी व्यक्त केले.
बादल ‘भीष्म पितामह’
८९ वर्षे वयाच्या प्रकाशसिंह बादल यांच्या ऋजू आणि विनम्र वर्तनाने पुणेकरांना जिंकले. राज ठाकरे यांनीदेखील टिळक स्मारक मंदिरात येताच बादल यांचे पाय शिवत नमस्कार केला. ‘भारताच्या राजकारणातले पांडवांच्या बाजूने असणारे भीष्म पितामह’ असा त्यांचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. बादल यांनी स्वत: पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी ठाकरे व फडणवीस यांचा सुवर्णमंदिराचा रजतपट आणि तलवार देऊन सत्कार केला. ‘पहिल्यांदा मला सत्कार करू द्या, मगच मी सत्कार स्वीकारतो’, अशी अटच त्यांनी आयोजकांना घातली होती. पुरस्काराची एक लाख अकरा हजार रुपयांची रक्कम बादल यांनी आयोजकांना परत केली. आयोजकांनी ही रक्कम घुमान येथील विकासकामांसाठी खर्च करण्याचे जाहीर केले.