आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी निधीशिवाय पंजाबी संमेलन यशस्वी : संजय नहार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे : पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. पंजाबी भाषा आणि संस्कृतीवर या निमित्ताने वेगळा प्रकाश पडला. मराठी-पंजाबी भाषांचे सख्य दृढ झाले आणि हे सारे कुठल्याही सरकारी निधीशिवाय साध्य झाले. पंजाबी बांधवांनीच सर्व खर्चाची जबाबदारी उचलली, असे प्रतिपादन ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार यांनी सोमवारी येथे केले.
निधीची गरज भागल्याने सरकारी संस्थांनी देऊ केलेली रक्कम तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे मंजूर झालेला २५ लाख रुपयांचा निधी स्वीकारायचा नाही, अशी आमची भूमिका आहे. हा निधी अन्य कामासाठी वळवला जावा, असे पत्र आम्ही महानगरपालिकेला दिले आहे, असेही नहार यांनी स्पष्ट केले.

गेल्या महिन्यात पुण्यात पहिले पंजाबी विश्व साहित्य संमेलन ‘सरहद’च्या वतीने आयोजिण्यात आले होते. या संमेलनासाठी एक कोटी रुपयांचा खर्च झाला. खर्चात काटछाट केल्याने आणि पंजाबी बांधवांनी सढळ हाताने मदत केल्याने हा खर्च आटोक्यात राहिला.

आचारसंहितेच्या कात्रीत सापडूनही त्यामुळेच संमेलन आम्ही यशस्वी करू शकलो. मूळ अडीच ते तीन कोटींचे बजेट आचारसंहितेनंतर एक कोटीवर आले. केवळ पंजाबी बांधवांच्या सहकार्यामुळेच आयोजकांवरचा आर्थिक ताण हलका झाला.
आर्थिक तूट भरून निघाल्याने मनपाकडून मंजूर निधीची आता आवश्यकता नाही. त्यामुळे पालिकेचा निधी सन्मानपूर्वक नाकारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,’ असे नहार म्हणाले. संतसिग मोखा, रवींद्रपालसिंग सेहगल यांच्या उपस्थितीत संमेलन खर्चाचा तपशील या वेळी जाहीर करण्यात आला.
कॅनडातून निमंत्रण
- पंजाबी संमेलनासाठी केंद्र सरकारतर्फे दोन कोटी तर महाराष्ट्र आणि पंजाब सरकारतर्फे प्रत्येकी २५ लाख रुपये मदत मिळणार होती. ती आता अनुक्रमे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील गुरू गोविंदसिंग अध्यासन व संत नामदेव अध्यासनासाठी मिळावी, असे पत्र संयोजकांनी यापूर्वीच पाठवले आहे.
पुढील संमेलनासाठी कॅनडातून निमंत्रण आले आहे. पण निमंत्रण स्वीकारणारी कोणतीही स्थायी यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे एक समिती नेमण्यात येणार आहे. त्यात पंजाब साहित्य अकादमीचे पदाधिकारी असतील.
- संजय नहार, सरहद संघटना
बातम्या आणखी आहेत...