आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - व्यंगचित्र मार्मिक, तरीही हसू फुलवणारे कसे असावे, याचा आदर्श आर. के. लक्ष्मण आहेत. देशात बहुसंख्य लोक टेकिंग विभागातील असताना, आरके मात्र गिव्हिंग गटातील आहेत. त्यांची व्यंगचित्रे हसू फुलवतानाच विचारांची पेरणीही करतात आणि म्हणूनच ती तरुणाईसाठी प्रेरक आहेत, असे गौरवोद्गार माजी राष्ट्रपती आणि मिसाइलमॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी रविवारी येथे काढले.
साहित्यवेध प्रतिष्ठान आणि सरस्वती वाचनालय यांच्या वतीने द अनकॉमन कॉमनमॅन या आर के लक्ष्मण यांच्या दुर्मिळ व्यंगचित्रप्रदर्शनाचे उद््घाटन डॉ. कलाम यांच्या हस्ते झाले. तसेच लक्ष्मण यांना डॉ. कलाम यांच्या हस्ते भारतभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापौर चंचला कोद्रे, कमला लक्ष्मण, श्रीनिवास लक्ष्मण, उषा लक्ष्मण, आयोजक कैलास भिंगारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ उद्योजक डी. एस. कुलकर्णी, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, समृद्ध जीवनचे महेश मोतेवार हेही उपस्थित होते. डॉ. कलाम म्हणाले, 1984 मध्ये पद्मविभूषण हा सन्मान स्वीकारताना शंभर वर्षांनंतरचे चित्र आरकेंनी मांडले होते. कलाकार त्याच्या अंत:प्रेरणेने कलाकृती निर्माण करतो. सौंदर्य, मूल्य यांच्या जोडीने तो प्रेम, शांतीचा संदेश देतो.
हा संदेश मानवी जीवनाला अर्थपूर्णता देतो. असा अर्थ दैवी देणगी लाभलेल्यांनाच जमतो. आरके त्यापैकीच आहेत. आमच्या जीवनातील हा अविस्मरणीय क्षण आहे. डॉ. कलाम यांच्या उपस्थितीने आमच्या आनंदात भर पडली आहे, असे मनोगत लक्ष्मण यांनी मांडले.
पेन आणि क्षेपणास्त्र
आरके यांनी माझे व्यंगचित्र रेखाटताना माझ्या केसापाशी एका बाजूला पेन आणि दुस-या बाजूला क्षेपणास्त्र दाखवले होते. ते व्यंगचित्र माझ्यासह माझ्या एका नातवालाही खूप आवडले होते आणि ते आठवून मला आजही हसू येते, अशी आठवण कलाम यांनी सांगितली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.