आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'खासदार मंडलिकांनी उतारवयात जातीयवादी पक्षासमोर लोटांगण घातले'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कोल्हापूरचे खासदार सदाशिवराव मंडलिक आयुष्यभर जातीयवादी पक्षांपासून दूर राहिले. मात्र आता उतारवयात मुलासाठी आणि सत्तेसाठी जातीयवादी पक्षांसमोर गुडघे टेकले आहेत अशी टीका गृहमंत्री आर आर पाटील यांनी केली. रामदास आठवले यांनी आंबेडकरी विचारांना तिलांजली दिली आहे. तर गोपीनाथ मुंडे यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचारांची गरज आहे. शिवबंधनच काय लोखंडी साखळ्या बांधल्या, तरीही उपयोग होणार नाही, अशी चौफेर टोलेबाजी करीत महायुतीवर सडकून टीका गृहमंत्र्यांनी केली. ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी कष्ट घेतले त्यांना डावलून संजय मंडलिकाना कोणत्या निकषांवर उमेदवारी दिली याचे उत्तर शिवसेना देईल का? असा सवालही गृहमंत्री पाटील यांनी सेनेला विचारला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पा आवाडे यांचे उमेदवारी अर्ज भरले. त्यापूर्वी गांधी मैदान इथे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि दोन्ही काँग्रेसच्या अन्य मंत्री आणि नेत्यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. या सभेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी चौफेर टोलेबाजी करीत महायुतीला लक्ष्य केले. महायुतीतील मुंडे, उद्धव, शेट्टी, आठवले आणि जानकर हे पांडव नसून संधिसाधू आहेत. देशात ‘नमो’ आणि महाराष्ट्रात ‘गोमुं’ यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे, पण मतदार त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशीही टीका केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी भाजप आणि मोदींवर टीका करताना, देशावर जातीयवादी शक्तींच संकट असून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलान मेहनत घेऊन धनंजय महाडिक आणि कल्लाप्पा आवाडे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले.