आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजीराव- नानासाहेब पेशव्यांची कादंबरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मराठी मनगटांचा पराक्रम, मराठी मुत्सद्देगिरी आणि मराठी बाणा ज्यांनी प्राणपणाने जपून, इतिहासाच्या पानांवर स्वनाममुद्रा कोरली, त्या पहिले बाजीराव पेशवे आणि त्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांच्या जीवनाचे चित्रण करणार्‍या दोन ऐतिहासिक कादंबर्‍यांच्या पुन:प्रकाशनाचा योग बर्‍याच वर्षांनी जुळून येत आहे. कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या वतीने या दोन्ही गाजलेल्या ललित साहित्यकृतींचे पुन:प्रकाशन इतिहासाचे गाढे अभ्यासक निनाद बेडेकर यांच्या हस्ते शनिवारी झाले.
‘राऊ’ ही ज्येष्ठ साहित्यिक ना. सं. इनामदार लिखित ऐतिहासिक कादंबरी पहिल्या बाजीरावांचे अतुलनीय शौर्य, कर्तृत्व, कामाचा झपाटा, मुत्सद्देगिरी यांचे चित्रण करत असतानाच त्यांच्या आयुष्यातील मस्तानीचा प्रवेश आणि त्या अनुषंगाने मराठ्यांच्या इतिहासात प्रथमच उधळले गेलेले प्रणयाचे गहिरे रंग आणि तत्कालीन सामाजिक वास्तवाचे चटके खात त्यांच्या आयुष्यांच्या झालेल्या शोकांतिकेवर प्रकाश टाकते.

‘वादळवारा’ ही कादंबरी पहिल्या बाजीरावांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांच्या कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकते. ही मूळ इंग्रजी कादंबरी मनोहर माळगावकर यांनी लिहिली आहे. त्याचा अनुवाद रससिद्ध लेखक भा. द. खेर यांनी केला आहे.
मराठ्यांच्या इतिहासात सर्वाधिक काळ पेशवेपदावर राहण्याची कामगिरी नानासाहेब पेशव्यांच्या नावावर आहे.

वाचकांच्या आग्रहामुळे पुन:प्रकाशन
राऊ कादंबरी इनामदारांनी 1974 मध्ये लिहिली होती. त्यामानाने वादळवारा अलीकडची आहे. 2008 मध्ये ती लिहिली गेली. या दोन्ही कादंबर्‍यांना मराठी वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. बर्‍याच वर्षांनी या दोन्ही वाचकप्रिय साहित्यकृती वाचकांच्या आग्रहाखातर पुन्हा नव्याने प्रकाशित करत आहोत, अशी माहिती कॉन्टिनेंटलच्या संचालक देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनी दिली.