आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा गांधीजींच्या मारेकर्‍याचा राहुलकडून ‘गोडसेजी’ उल्लेख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महात्मा गांधीजी यांची गोळ्या घालून हत्या करणारा नथुराम गोडसे याचा चक्क ‘गोडसेजी’ असा आदराने उल्लेख काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पुण्यात केला. जाहीर सभेत त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यासह उपस्थित काँग्रेस नेते मात्र अस्वस्थ झाले.

महाराष्ट्रातील दुसर्‍या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रचाराची सांगता मंगळवारी झाली. पुण्यातील उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राहुल गांधींनी नथुराम गोडसे याचा उल्लेख सातत्याने ‘गोडसेजी’ असाच केला.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विश्वजित कदम आदी या वेळी उपस्थित होते.
‘एकीकडे टिळक, गोखले, गांधी यांची देश जोडणारी प्रेमाची विचारधारा आहे. दुसर्‍या बाजूला ‘गोडसेजी’ यांची क्रोध, तिरस्काराची देश तोडणारी विचारधारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशात सध्या विचारधारांची लढाई सुरू आहे. मात्र, देशाला जोडणारी विचारधारा कॉँग्रेसची असून जनता सदैव याच विचारधारेच्या पाठीशी उभी राहिली. याहीवेळी देश तोडणार्‍यांचा पराभव होईल’, असा विश्वासही राहुल यांनी व्यक्त केला.

टॉफी मॉडेलचा पैसा प्रचारात
हिंगोली 2 उद्योगपतींना सवलती आणि जनतेचे हाल असे विरोधाभासी चित्र गुजरातेत आहे. काँग्रेसचा उद्योगपतींना विरोध नाही. गरिबी हटवण्यासाठी आम्हाला गरीब आणि उद्योगपतींमध्ये पार्टनरशिप निर्माण करायची आहे, असे राहुल यांनी प्रचार सभेत सांगितले. काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांच्या प्रचारार्थ राहुल यांनी मंगळवारी हिंगोलीत घेतलेल्या सभेनेच मराठवाड्यातील प्रचाराची सांगताही झाली.

द्वेषामुळे देश पुढे जाणार नाही
विरोधक हिंदू-मुस्लिमांत, दोन राज्यांतील लोकांत भांडणे लावतात, कर्नाटकात महिलांना मारहाण केली जाते. राग, द्वेषाच्या राजकारणामुळे देश कधीच पुढे जाणार नाही. आम्ही समाजात बंधुभाव निर्माण केला आहे. बंधुत्व आणि प्रेम यामुळेच हिंदुस्थान महासत्ता होईल, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला. महिला सुपरपॉवर झाल्या तरच आपला देश सुपरपॉवर होईल. त्यामुळे महिलांना 33 टक्के आरक्षण दिले जाईल. 70 टक्के गरिबांना मध्यमवर्गीयांत आणण्याचे स्वप्नही राहुल यांनी बोलून दाखवले. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित होते.

‘इंडिया शायनिंग’चे काय झाले?
‘पुणे हे एक शहर नसून विचारधारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, टिळक, गोखले, गांधी यांनी या विचाराची पायाभरणी केली. समाजातल्या प्रत्येकाला सामावून घेत प्रगती करण्याची, प्रेमाची ही विचारधारा गोडसेजींना संपवता आली नाही म्हणून त्यांनी महात्मा गांधींना गोळ्या घातल्या. परंतु ते आमच्या विचारधारेला संपवू शकत नाहीत. 2004 मध्येही विरोधकांनी ‘इंडिया शायनिंग’चा धुरळा उडवला होता. मतमोजणीनंतर मात्र त्यांना काय झाले हे समजलेच नाही,’ असे गांधी यांनी स्पष्ट केले.