आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात पावसाचा मोठा अनुशेष, आठही जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कोकणातील चार आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये पावसाने जूनची सरासरी ओलांडली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगावातील सर्व तालुक्यांत पावसाने सरासरी गाठली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, कोल्हापूर साता- यात सर्वत्र सरासरीएवढा पाऊस पडला आहे. गेल्या चोवीस तासांपासून मराठवाड्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असला तरी आठपैकी एकाही जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पावसाने अजून जूनची सरासरी गाठलेली नाही.

मराठवाडा, विदर्भात मान्सून सक्रिय झाला असून येत्या चोवीस तासांत मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामानखात्याने म्हटले आहे. कोकण आणि विदर्भातही सर्वत्र मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.


यंदा 4 जूनला तळकोकणात मोसमी पाऊस दाखल झाला. तेव्हापासून कोकणातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. जूनच्या दुस-या आठवड्यानंतर विदर्भातही सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यात हिंगोलीचा अपवाद वगळता सर्वत्र बेताचा पाऊस आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुका वगळता एकाही तालुक्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. याउलट नाशिक जिल्ह्यात येवल्याचा अपवाद वगळता सर्व तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. नंदुरबार व जळगावातल्या सर्व तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली.


सर्वाधिक पावसाचे तालुके : दापोली (रत्नागिरी)- 1609, बावडा (कोल्हापूर) - 1506, खेड (रत्नागिरी) - 1457.
कमी पावसाचे तालुके : बार्शी (सोलापूर) - 42.7, पलुस (सांगली) - 43, मंगळवेढे (सोलापूर) - 52.3


उस्मानाबादची परिस्थिती वाईटच
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याची पावसाची प्रतिक्षा नेहमीप्रमाणे कायम आहे. सोलापूरात माढा, माळशिरस या दोन तालुक्यांत व्यतिरीक्त सर्व तालुक्यांमध्ये पाऊस बेताचा आहे. शेजारच्या उस्मानाबादची परिस्थिती सोलापूरपेक्षा वाईट आहे. नगर जिल्ह्यातली स्थिती संमिश्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, कन्नड, खुल्ताबाद, फुलंब्री येथे पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे. जालन्यातील परतुर, बदनापुर, मंठा, घनसावंगी येथे अजून सरासरी गाठायची आहे. लातुरमध्ये निलंगा आणि बीडमधील वडवणी, पाटोदा वगळता कुठेच समाधानकारक पाऊस नाही. नांदेड, परभणी या दोन्ही जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे.


25 जूनपर्यंतचा पाऊस (मि.मी.मध्ये)
तालुका अपेक्षित पाऊस प्रत्यक्ष पाऊस
पैठण 119.4 107.4
गंगापूर 127.8 117.3
कन्नड 145.7 123.9
खुलताबाद 151.0 140.4
फुलंब्री 135.5 114.7
परतुर 132.7 117
बदनापुर 163.7 112.4
घनसावंगी 128.1 114.7
मंठा 124.9 83
आष्टी 119.4 88.6
गेवराई 138.5 131.5
माजलगाव 133.8 104.8
अंबाजोगाई 136.7 121.9
केज 134.7 114.7