आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात तुरळक पावसाचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बंगालच्या उपसागरात घोंगावणार्‍या चक्रीवादळामुळे भारतीय उपखंडातील हवामान बदलले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

तामिळनाडूतील चेन्नईच्या आग्नेय दिशेला साडेआठशे किलोमीटर अंतरावर चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाचे नामकरण ‘महासेन’ असे करण्यात आले आहे. पुढील 36 तासांत महासेन बांगलादेश आणि म्यानमारच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. या वादळामुळे झारखंड ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. चक्रीवादळाच्या परिणामामुळे शक्यता असल्याने हा पाऊस झाल्यास त्याला ‘पूर्व मोसमी’ म्हणता येणार नाही, असे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले. अंदमान-निकोबार बेटांवर अतिवृष्टीचा इशारा आहे.

चंद्रपूर 45 अंशांवर
राज्यात उसळलेली उष्णतेची लाट रविवारी कायम होती. मराठवाडा, विदर्भात बहुतांश गावांतील पारा चाळीस अंशांच्या पुढे होता. खान्देश आणि नगर-सोलापूर या जिल्ह्यांमधील तापमानही चाळीस अंशांच्या पुढे होते. सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूरला (45 अंश) झाली. येत्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. खान्देशातील वातावरण कोरडे आणि सूर्यप्रकाशयुक्त असेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.