आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून डेरेदाखल, दक्षिण महाराष्ट्रात अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रासाठी सुखद बातमी आहे. पाणीटंचाईच्या असह्य झळांवर धुवाधार शिडकावा करत मान्सून राज्यात दाखल झाला असून, मंगळवारी, 4 जूनपासून यंदाचा पावसाळा अधिकृतरीत्या सुरू झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. यंदाचा अभूतपूर्व दुष्काळ संपवण्याची कामगिरी हा पावसाळा करणार काय, याचे उत्तर चार महिन्यांनंतर स्पष्ट होणार आहे.

जूनच्या 1 तारखेला मान्सून केरळात आला. वेगाने आगेकूच करत तीनच दिवसांत त्याने कोकण किनारपट्टी ओलांडली. मंगळवारी राज्यातील पठारावर प्रवेश करत मान्सूनने सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातार्‍यापर्यंतचे आकाश व्यापले. कोकण किनारा आणि केरळच्या उत्तर किनार्‍यापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आहे. मध्य अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात मान्सून सक्रिय राहील. येत्या 24 तासांत दक्षिण महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकेल, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. उर्वरित राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज आहे, असे पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले आहे. पेरणीपूर्व मशागत पूर्ण करून पावसाची वाट पाहणार्‍या शेतकर्‍यांना मान्सूनच्या आगमनामुळे दिलासा मिळाला आहे.

मराठवाड्यात 10 जून रोजी आगमनाची चिन्हे
हर्णे, सातार्‍यापर्यंत पोहोचलेला मान्सून राज्यात सक्रिय झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तो सरसावण्यासाठी येत्या तीन-चार दिवसांत अनुकूल हवामानस्थिती निर्माण होईल. साधारणत: 10 जूनपर्यंत तो या भागात पोहोचतो. तोपर्यंत या ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे.’
- मेधा खोले, उपमहासंचालक, भारतीय हवामान विभाग