आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात दुष्काळाच्या धगीवर रिमझिम पावसाचा शिडकावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ऐन दुष्काळात शुक्रवारी रिमझिम पावसाने राज्याच्या काही भागात हजेरी लावली. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने उन्हाची काहिली कमी झाली आहे. पुढील चोवीस तासात विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.

पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले, की श्रीलंकेच्या किनार्‍यावर वादळ झाले. त्यामुळे तामिळनाडू व महाराष्ट्रापर्यंत जमिनीपासून एक किलोमीटर उंचीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या भागात बंगालच्या उपसागरातून बाष्प येत आहे. यामुळे राज्यात पुणे, कोल्हापूरसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि रिमझिम आहे.

ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा कडाका ओसरला आहे. चाळीस अंशांपुढे झेपावणारा तापमानाचा पारा घसरला. भीरा (रायगड), मालेगाव येथे राज्यातील सर्वाधिक 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. खान्देश, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक गावांचे तापमान 35 अंश सेल्सिअसपुढे आहे.

बागांना धोका नाही
रब्बी पिकांच्या काढणीची कामे राज्याच्या अनेक भागात सुरू आहेत. पिके काढून पडली आहेत. द्राक्ष आणि आंब्याची झाडे फळांनी लगडलेली आहेत. खळ्यातली पिके आणि फळबागांना मुसळधार पावसाचा धोका नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. हलक्या रिमझिम सरींचा अंदाज आहे. मुसळधार, वादळी पाऊस पडण्याची शक्यता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.