आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र चिंब : ‌‌उशिरा आगमन, पण विक्रमी बरसात; मुंबईत सर्वोच्च पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जेमतेम १५ दिवसांतच नैऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) राज्यातल्या २८ जिल्ह्यांमध्ये संपूर्ण जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नगर, नाशिक आणि सोलापूर या सात जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊस अजून जूनची सरासरी गाठलेली नाही.

यंदा आठ जूनला तळकोकणात आगमन झालेल्या मान्सूनने एका आठवड्यातच राज्य व्यापले. मात्र त्यानंतर सर्वदूर बरसलेल्या पावसाने आगमनातली दिरंगाई झाकोळून टाकली. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तवला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या पावसाची सुरुवात दिलासादायक झाली. कोकणातील अनेक गावांमध्ये तर गेल्या ५० वर्षांत झाला नाही इतका मुसळधार पाऊस गेल्या पंधरवड्यात झाला आहे.

पावसाचा जोरदार धडाका हे जूनमधल्या पावसाळ्याचे वैशिष्ट्य राहिले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक गावांमधल्या पावसाने ६०० मिलिमीटरचा आकडा आताच ओलांडला आहे. रायगड जिल्ह्यातल्या मुरुड, श्रीवर्धन, म्हसाळा, तळा तसेच रत्नागिरी, चिपळूण, दापोली, गुहागर या तालुक्यांमध्ये तब्बल ८०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळला आहे. सह्याद्री डोंगरमाथ्यावरच्या ताम्हिणी, आंबोणे, लोणावळा, कोयना या परिसरातही कमी कालावधीत विक्रमी बरसात झाली. हमखास पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या या प्रदेशातसुद्धा पावसाने सरासरी ओलांडली आहे.

मराठवाड्यात औरंगाबाद, हिंगोली, जालना, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाने जूनची सरासरी ओलांडली आहे. मात्र पैठण, सोयगाव, वसमत, घनसावंगी, या तालुक्यांमध्ये पावसाने अद्याप सरासरी गाठलेली नाही. नगर जिल्ह्यातही बेताचा पाऊस झालाय. मुळात नगरची जूनची सरासरी ८१.१ मिलिमीटर इतकी कमी आहे. त्यातही यंदा पडलेला पाऊस ७७ मिलिमीटर आहे. शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर या तालुक्यांत पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे. नाशिकची जूनमधील सरासरी १२३.५ असताना आजवर केवळ ७६.४ मिलिमीटर पाऊस झाला.

गंगापूर धरणात ४० टक्के पाणी
गेल्या वेळीपेक्षा यंदा धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्याने बळीराजा समाधानी आहे. जिल्ह्यात गतवर्षी २४ जूनपर्यंत केवळ एकूण ४२०.३ मिलिमीटर पाऊस पडला होता, तर या वर्षी याच दिवसापर्यंत १६६७.७ मिलिमीटर अधिक पाऊस पडून एकूण २०८७.७ मिलिमीटरची नोंद झाली. रविवारपासूनच्या पावसामुळे गंगापूर धरणात जवळपास ४० टक्के पाणीसाठा झाला आहे. इगतपुरी तालुक्यात आतापर्यंत ५८१ मिलिमीटर पाऊस पडला असून त्या खालोखाल त्रंबकेश्वर तालुक्यात २४१ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. नाशिक शहर व परिसरात मंगळवारी रात्री सोसाट्याच्या वार्‍यासह काेसळलेल्या पावसामुळे शेकडाे वृक्षे उन्मळून पडली, त्यामुळे काही रस्त्यावरील वाहतुकीस अडथळे आले. ३८ ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांनी मार्ग माेकळे केले.
पंचवटीतील मखमलाबाद येथे महापाैरांची रुग्णवाहिका व मुंबई नाका येथे एक टपरी वृक्षाखाली अडकली हाेती.

साेलापूर ‘दुष्काळी’च
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सोलापूरवरचा दुष्काळी शिक्का मात्र कायम राहील, याची काळजी पावसाने घेतली आहे. सोलापूरची जूनची सरासरी ८१.६ मिलिमीटर आणि झालेला पाऊस ५९ मिलिमीटर अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील करमाळा वगळता एकाही तालुक्यात सरासरीइतका पाऊस झालेला नाही.

६४ वर्षांचा विक्रम माेडला
मुंबई गेल्या आठवड्यात पावसाने तुंबली. यात मुंबई महापालिकेच्या अकार्यक्षमतेचा जितका दोष होता तितकाच दोष विक्रमी मान्सूनचाही होता. मुंबईत आतापर्यंतच्या जूनमध्ये १०९१ मिलिमीटर पाऊस बरसला. जून महिन्यात मुंबईत झालेला हा गेल्या ६४ वर्षांतील सर्वाधिक पाऊस आहे. यापूर्वीचा मुंबईतील जूनमधला सर्वाधिक पाऊस सन १९७१ मध्ये १०३७ मिलिमीटर झाला होता.

चक्रीवादळाच्या अफवांचे पीक
मुंबईत चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे संदेश साेशल मीडियातून पसरवले जात आहेत. या माध्यमातून अकारण जनतेमध्ये घबराट पसरवणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवावेत, अशी विनंती महापालिका प्रशासनाने मुंबई पोलिसांकडे केली आहे. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) तथा बृहन्मुंबई आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संजय देशमुख यांनी याबाबत पत्र दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...