आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा- विदर्भावर दाटले पावसाळी ढग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मराठवाडा, विदर्भावर पावसाळी ढगांनी गर्दी केली असून अनेक ठिकाणी मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील सह्याद्री रांगा परिसरातील पावसाचा जोर कायम राहणार असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

उत्तर बंगालचा उपसागर व लगतच्या भागावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून ते आता पश्चिम बंगाल व लगतच्या भागाकडे सरकले आहे. दक्षिण गुजरात ते केरळपर्यंतच्या किनार्‍यालगत असलेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे. या अनुकूलतेमुळे महाराष्ट्रावर मोठय़ा प्रमाणात पावसाळी ढग वाहून आले आहेत. ही स्थिती राज्यातील पावसासाठी अनुकूल आहे. यामुळेच आठवड्याभरापासून मान्सून सक्रीय झाल्याचे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले.

ताम्हिणीत सर्वाधिक : गेल्या 24 तासांपासून कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मराठवाड्यात मात्र तुरळक पाऊस आहे. पुण्याजवळच्या ताम्हिणी येथे राज्यातील सर्वाधिक 410 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरात 309 मिलिमीटर पाऊस कोसळला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि माथेरान, कोयना, कर्जत, इगतपुरी आदी ठिकाणी शंभर मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला.