आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात संततधार; धरणातून 23 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; वाहतुकीच्या कोंडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मंगळवारपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणसाखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव ही धरणे काठोकाठ भरल्याने बुधवारी पहाटेपासून खडकवासाला धरणातून २३ हजार क्युसेकचा विसर्ग मुठा नदीत करण्यात येत आहे. परिणामी शहराच्या मध्यभागातून वाहणारी  मुठा तुडुंब भरली असून डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.     

नदीकाठाने असणाऱ्या काही वस्त्यांत पाणी शिरण्याची शक्यता असल्याने पोलिस आणि मनपा आपत्ती व्यवस्थापन विभागाची यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.  पिंपरी-चिंचवड परिसरातही पावसामुळे पवना नदीवरील धरणातून सुमारे तीन हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पवना नदीही दुथडी भरून वाहत आहे. गेल्या २४ तासांत पवना धरण क्षेत्रात ६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरू असून चोवीस तासांत १२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मोसमात लोणावळ्यात एकूण पाच हजार १५७ मिमी पाऊस कोसळला आहे.    
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील १४ धरणे शंभर टक्के भरली आहेत. पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणांतून विसर्ग अपरिहार्य असल्याने जिल्ह्यातील बहुतेक सर्व नद्यांमधून पाणी सोडण्यात येत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवनावर परिणाम झाला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडून नदीत पाणी सोडले जात आहे. राधानगरी धरणातूनही विसर्ग सुरू असून काही गावांना  पुराचा धोका आहे.
 
मुसळधार पावसाचा अंदाज  
अरबी समुद्रात गुजरातचा दक्षिण भाग आणि लगतच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याच वेळी बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्याच्या बहुतेक भागावर द्रोणीय क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता अधिक असल्याने मुसळधार पाऊस होत आहे. पुढील २४ तासांतही अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.   
ए. के. श्रीवास्तव,  हवामानतज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...