आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात मुसळधार, राज्य प्रतीक्षेतच, २५ अाॅगस्टनंतर उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनची अाशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- यंदाच्या पावसाळ्याचे अडीच महिने संपायला आले तरी विदर्भ- कोकण वगळता राज्यात पावसाने समाधानकारक बरसात केलेली नाही. येत्या काही दिवसांत या स्थितीत मोठा बदल होण्याची अपेक्षाही हवामान तज्ज्ञांना नाही. २५ ऑगस्टच्या दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र विभागाने (आयआयटीएम) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार येत्या आठ-दहा दिवसांत मान्सून सर्वत्र सक्रिय होण्याची शक्यता कमी दिसते आहे. २० ऑगस्टच्या सुमारास अनुकूल हवामान बदल घडून दक्षिण भारतात मान्सूनला चालना मिळू शकेल. त्यानंतर २५ ऑगस्टच्या दरम्यान मध्य भारतात मान्सून पुन्हा सक्रिय होईल, अशी चिन्हे आहेत. तूर्तास विदर्भावर पावसाने चांगली कृपादृष्टी सुरू ठेवली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देशावर मात्र वक्रदृष्टीच
पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले की, उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या ओरिसावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता मध्य प्रदेश, विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडच्या भूभागाकडे सरकले आहे. बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या बाष्पामुळे विदर्भ, मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम किनारपट्टीवरील अनुकूलतेमुळे कोकण-गोवा आणि नजीकच्या सह्याद्री डोंगररांगामध्येही पावसाचे प्रमाण चांगले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खान्देशात मात्र मान्सून सक्रिय नाही.

२० जिल्हे सरासरीपासून दूरच
कोकण- विदर्भ वगळता उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आहे. मध्यम ते हलक्या सरीही अनेक गावांमध्ये हजेरी लावत आहेत. मात्र, मान्सूनला चालना देणारे हवामान बदल होत नसल्याने मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हे वर्ष बेताच्या पावसाचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने मे महिन्यातच वर्तवला होता. हा अंदाज आतापर्यंत खरा ठरल्याचे चित्र राज्यभर आहे. संपूर्ण राज्यातील २० पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये पावसाने अजूनही सरासरीदेखील गाठलेली नाही.
येत्या दाेन दिवसांत विदर्भात पुन्हा जाेरदार पावसाची शक्यता
दोन दिवसांत विदर्भात अनेक ठिकाणी, तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण- विदर्भात एक-दोन ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. देशपातळीवर सध्या सरासरी पाऊसमानात ९ टक्क्यांहून अधिक तूट आहे.

दुष्काळी मराठवाड्याची अाशा ‘स्कायमेट’वर
बंगाल उपसागरातील ओडिशा आणि नजीकच्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ असणारे कमी दाबाचे क्षेत्र येत्या २४ तासांत भूभागावर येणार आहे. या हवामान बदलांमुळे छत्तीसगड, तेलंगण, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. कोकण ते केरळपर्यंतच्या पश्चिम किनारपट्टीवरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रातही पाऊस हजेरी लावेल. स्कायमेट या खासगी संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे.