आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाने वाढवली शेतकऱ्यांची ‘पत’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दमदार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी ३१ हजार ३१३ कोटी रुपयांचे कर्ज खरिपासाठी घेतले आहे. राज्यातल्या ४६ लाख ९ हजार ६४० खातेदारांनी खरीप पिकांसाठी कर्ज घेतल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

सन २०१६- १७ च्या खरिपात ३७ हजार ६७७ कोटी रुपयांच्या कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले होते. यापैकी ८३ टक्के लक्ष्यपूर्ती बँकांनी गाठली आहे. यापूर्वी सलग तीन वर्षांच्या अवर्षणामुळे शेतकऱ्यांची पत कमी झाली होती. मात्र, यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त झाल्यानंतर सरकारी यंत्रणांनी कर्जवाटपासाठी नियोजन केले. शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या आणि पुनर्गठित कर्जदार शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिल्या होत्या.

राज्यातल्या खातेदार शेतकऱ्यांची संख्या एक कोटी ३६ लाख ४३ हजार आहे. यापैकी किमान ८० टक्के शेतकऱ्यांना कर्जपुरवठा झाला पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मे महिन्यात झालेल्या खरीपपूर्व आढावा बैठकीत बँकांना दिले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना १३ हजार ११४ कोटी, व्यापारी बँकांना २२ हजार १६८ कोटी, तर ग्रामीण बँकांना २ हजार ३९५ कोटी रुपये कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँकांनी ९४ टक्के, तर व्यावसायिक बँकांनी ७७ टक्के लक्ष्यपूर्ती केली आहे.

दरम्यान, गेल्या तीन वर्षांतील सर्वच धरणांत सर्वोच्च पाणीसाठा यंदा आहे. अनेक जिल्ह्यांमधल्या अतिवृष्टीमुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. यामुळे रब्बी आणि उन्हाळी पिकांच्या लागवडीत यंदा भरघोस वाढ होण्याची चिन्हे आहेत. दोन वर्षांपासून मागे पडलेल्या फळबागांची लागवड वाढण्यासाठी कृषी विभागाने यंदा विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामुळे रब्बीतील कर्जाची मागणी आणखी वाढेल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. रब्बी हंगामासाठी १३ हजार ५६८ कोटी रुपये कर्जवाटपाचे लक्ष्य बँकांना देण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्र सर्वाधिक कर्जबाजारी
खरिपाचे कर्ज घेण्यात पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी राज्यात अाघाडीवर असल्याचे अाकडेवारी सांगते. पश्चिम महाराष्ट्रातल्या १८ लाख ४९ हजार खातेदारांनी १४ हजार ४२२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. सर्वात कमी कर्जदार कोकणात आहेत. कोकणातल्या २ लाख १४ हजार ७८० शेतकऱ्यांनी ७६२ कोटी रुपये कर्ज घेतले आहे. मराठवाड्यातल्या १४ लाख ५४ हजार शेतकऱ्यांनी ८ हजार २७४ कोटी रुपयांचे खरीप कर्ज घेतले आहे. विदर्भातल्या १० लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी ७ हजार ८५४ कोटी रुपये कर्ज घेतले आहे.
बातम्या आणखी आहेत...