आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनची ‘दिवाळी’ राज्यातच,परतीचा प्रवास लांबला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गेल्या 50 वर्षांतील सर्वाधिक काळ मुक्कामाचे वर्ष अशी यंदाच्या मान्सूनची नोंद होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी 1 ऑक्टोबरला खान्देश आणि कोकण किनारपट्टीतून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून दहा ऑक्टोबरपर्यंत राज्यातूनच काढता पाय घेत असतो. यंदा मात्र 10 ऑक्टोबर उजाडला तरी त्याचा परतीचा प्रवास राजस्थानमध्येच अडखळला आहे. हवामानाची सद्य:स्थिती कायम राहिली तर दिवाळीपर्यंत राज्यात त्याचा मुक्काम असेल, अशी शक्यता आहे.


पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले, ‘बंगालच्या उपसागरात चक्राकार वादळ सुरू आहे. यामुळे ईशान्य व उत्तर भारतामध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरातील हवामानस्थितीत लक्षणीय बदल होण्याची शक्यता नसल्याने आणखी आठ ते दहा दिवस मान्सूनचा परतीचा प्रवास रखडलेलाच असेल. महाराष्ट्रातून मान्सून कधी परतेल, हे उत्तरेतील हवामान स्थितीवरच ठरेल.


पुढे काय? दोन दिवसांत पुन्हा बरसणार
राज्याच्या अनेक भागांत अजूनही पाऊस सुरू आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. पुुढील दोन दिवसांतही या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, असे हवामान खात्यातील सूत्रांनी सांगितले. राजस्थानात अडखळलेला मान्सून पाहता यंदाच्या पावसाळ्याचा कालावधी 120 दिवसांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.


परतीचा कालावधी असा
गेल्या दशकभरात मान्सूनचा परतीचा कालावधी सातत्याने वाढला असल्याचे चित्र राज्यात आढळून आले आहे. मुक्काम वाढलेल्या तारखा खालीलप्रमाणे.
2012 12 ऑक्टोबर
2011 24 ऑक्टोबर
2010 26 ऑक्टोबर
2009 20 ऑक्टोबर


विदर्भात विजेचे 3 बळी
जिल्ह्यात बुधवारी दीड तासात सुमारे 75 मिमी पावसाची नोंद झाली. घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा येथे शेतात काम करणा-या निर्मला मासूळकर व वामन जोगी यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला, तर तिवसा येथे शेतात काम करणा-या प्रमिला राठोड यांचाही अंगावर वीज पडून मृत्यू झाला.