आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain Slow Down In Pune, Nagar; Spread In Marathwada

पुणे, नगरचा जोर ओसरला; मराठवाड्यात सर्वदूर पाऊस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गेल्या चोवीस तासांत नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) राज्यात सर्वदूर बरसला. कोकण आणि सह्याद्री डोंगररांगांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक होता. कोकणात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मराठवाड्यात सर्वत्र पावसाने तोंड उघढले असून कमीअधिक प्रमाणात रिमझिम झाली. विदर्भात तुलनेने पावसाचे प्रमाण घटले.


‘चार दिवसांपासून गुजरात ते लक्षद्वीपपर्यंत असलेले कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. मात्र, समुद्रसपाटीवर असलेल्या मान्सूनच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा काही भाग सामान्य स्थितीत आला आहे. यामुळे कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे,’ असे हवामान खात्याच्या सूत्रांनी स्पष्ट केले.


कोकणातल्या अनेक गावांत शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळला. कोयना धरणाच्या लाभक्षेत्रातल्या मुसळधार पावसामुळे चोवीस तासांतच धरणात तीन टीएमसी पाणी जमा झाले. पुणे, सातारा, सोलापूर, नगर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरला होता. मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, नांदेडमधल्या सर्व तालुक्यांत पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगावात काही ठिकाणी मध्यम सरी पडल्या. विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले.


24 तासांतील पाऊस (मिमी)
ठाणे - 70.2, कर्जत - 135, रत्नागिरी - 102, खेड - 135, मालवण - 95, नाशिक - 3.8, इगतपुरी - 65, शिरपूर - 41, सिंदखेडा - 36, जळगाव - 16, भुसावळ - 11.5, एरंडोल - 21, पुणे - 19, सोलापूर - 0.1, महाबळेश्वर - 105.5, औरंगाबाद - 6.9, जालना - 17.5, धारूर - 17.3, लातूर - 1.8, उस्मानाबाद - 4.3, नांदेड - 37.1, परभणी - 15.1, हिंगोली - 10.९.


‘हजारी’ पावसाची गावे
यंदाच्या पावसाळ्याच्या पहिल्या पंधरवड्यातच राज्यातील नऊ गावांमध्ये एक हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस बरसला आहे. उरण - 1068, पेण - 1157, तळा - 1090 (रायगड), चिपळूण - 1114, दापोली - 1451, खेड - 1325, गुहागर - 1053 (रत्नागिरी), महाबळेश्वर - 1224 (सातारा), गगनबावडा - 1176 (कोल्हापूर).