आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गलितगात्र राज’सेने'ला आता बहुचर्चित ‘ब्ल्यू प्रिंट'चा आधार, मनसेला उमेदवारही मिळेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - लोकसभा निवडणुकीत जबरदस्त धोबीपछाडनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अवसानघात झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती पक्षाला आणखी गलितगात्र करणारी आहे. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित होणाऱ्या ब्ल्यू प्रिंटमुळे कार्यकर्त्यांमध्ये जान येईल, अशी आस मरगळ आलेले पदाधिकारी लावून बसले आहेत.

१० सप्टेंबरला मनसेची ‘ब्ल्यू प्रिंट' प्रकाशित होत आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे जे भाषण करतील यातून पक्षाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मनसे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासंदर्भात मात्र कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता नाही. ‘बोलावणे आले तरच जायचे,' असे सांगण्यात आले. राज्यात मुंबई, नाशिकपाठोपाठ राज ठाकरे यांना सर्वाधिक प्रतिसाद पुण्याने दिला. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत ‘मनसे'चे २८ नगरसेवक निवडून आल्यानंतर पुणे मनसेचे मुख्य ठाणे बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र लोकसभेच्या निकालाने या प्रयत्नांना सुरुंग लागला. कोथरूड, पर्वती, खडकवासला, शिवाजीनगर, कसबा या मतदारसंघांतून आमदार होण्याचे स्वप्न गुडघ्याला बािशंग बांधून बसणाऱ्या नगरसेवकांनीही आता हाय खाल्ली आहे. "तरुणांची गर्दी ओसरली आहे. संघटनात्मक ताकद नाही. मनसेची हवाही आता दिसत नाही. असे असताना निवडणुकीचा खर्च कोण करणार?," असा सवाल इच्छुकांचा आहे.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या पट्ट्यात आव्हान उभे केले होते. राज यांचा करिश्मा आणि पर्याय म्हणून मतदारांनीही मनसेला मतदान केले. मात्र गेल्या पाच वर्षांत पक्षाचे आमदार आणि नगरसेवकांनी सर्वच पातळ्यांवर भ्रमनिरास केल्याने मनसेचा जोर ओसरला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मनसेच्या बहुतेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. या धक्क्यातून ‘ब्ल्यू प्रिंट'चे सोपस्कार सावरून नेईल, अशी आशा पदाधिकाऱ्यांना आहे.

परीक्षेला नाहीत ‘विद्यार्थी'
२०१२ मध्ये पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी मनसेने लेखी परीक्षा घेतली हाेती. यंदाच्या विधानसभेसाठी उमेदवार शोधताना परीक्षा कोणाची घ्यायची, असा प्रश्न मनसेपुढे होता. इच्छुकांची संख्या आटल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी चुरसच नव्हती. पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक यांनीच विधानसभा लढण्याची तयारी दाखवली. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील २० जागांच्या मुलाखती अवघ्या काही तासांत उरकाव्या लागल्या.
पहिली जागा तर गमावली
पश्चिम महाराष्ट्रात मनसेचे इंजिन पहिल्यांदा धावले ते पुण्यातील खडकवासला मतदारसंघात. ‘गोल्डमॅन' म्हणून प्रसिद्ध झालेले रमेश वांजळे यांनी येथे ‘राष्ट्रवादी'चा दारुण पराभव करत मनसेचा पहिला झेंडा रोवला. वांजळे यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली. अजित पवारांनी वांजळे यांच्या पत्नीला ‘घड्याळा'वर उभे करण्याचा डाव खेळल्याने मनसे तटस्थ राहिली. मतदारांनी वांजळेंच्या पत्नीला नाकारत महायुतीला निवडून दिले. पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव जागा मनसेला गमवावी लागली.
‘गोल्डमॅन'बरोबर गेली पक्षाची झळाळी
दक्षिणी चित्रपटातील खलनायकासारखे दिसणारे रमेश वांजळे प्रत्यक्षात मृदू होते. ज्ञानेश्वर, तुकारामांचे अभंग त्यांना तोंडपाठ होते. अंगभर दोन-अडीच किलो सोने, मिठास वाणी आणि लक्षवेधी व्यक्तिमत्त्वाच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात ते आमदार झाले. विधिमंडळात अबु आझमी यांना ‘तू आझमगड का तो मै सिंहगड का' असे आव्हान देत वांजळे यांनी आझमी यांच्यासमोरच्या माइकचे पोडियमही उखडून टाकले होते. यानंतर त्यांची लोकप्रियता वाढली. वांजळे यांनी खडकवासलाच नव्हे तर पुणे जिल्ह्यात पक्ष संघटना बांधण्यास सुरुवात केली. हिंदू मतदारांना काशी, दलितांना दीक्षाभूमी तर मुस्लिमांना अजमेरची यात्र घडवत त्यांनी जनसंपर्क वाढवत नेला. तरुण कार्यकर्त्यांचे मोहोळ त्यांच्याभोवती गोळा झाले होते. मात्र २०११ मध्ये त्यांचे अाकस्मिक निधन झाले आणि मनसेने खंदा संघटक गमावला. पक्षात त्यांची जागा कोणी भरून काढू शकलेले नाही.