आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुलंच्या व्यक्तिरेखांचं प्रदर्शन मांडायचंय : राज ठाकरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पु. ल. देशपांडे यांनी रंगवलेल्या नारायण, रावसाहेब, हरितात्या, अंतू बर्वा..या व्यक्तिरेखा मला कशा दिसतात, मला कशा जाणवतात, हे मांडणारे प्रदर्शन पुढच्या वर्षी मला रसिकांसमोर आणायचे आहे. त्यादृष्टीने कामाला लागलो आहे..असे सांगणारे, बाळासाहेबांच्या ‘मिनिंगफुल शिव्या’ खाण्याची सवय असलेले आणि आपल्या मार्गातल्या सर्व अडथळ्यांवर मात करण्याची प्रेरणाही बाळासाहेबांकडूनच मिळाली, असं दाटून आलेल्या आवाजात सांगणारे, महाराष्ट्राच्या ‘रचने’चं स्वप्न पाहणारे, कुठल्याही सर्जनशील रचनेसाठी पैशापेक्षा इच्छाशक्ती लागते, हे ठणकावून सांगणारे..असे राज ठाकरे यांचे एक वेगळे रूप रसिकांनी शनिवारी सायंकाळी अनुभवले. निमित्त होते ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे.
राज म्हणाले,“महाराष्ट्रावर मला उत्तम माहितीपट करायचा आहे. कलाकार म्हणून फिल्म मेकिंग हे माझे पॅशन आहे. माझ्या मनातले सारे मला त्यात दृश्यभाषेत मांडायचे आहे. मी अनेक देशांत फिरलो आहे. त्या प्रत्येक ठिकाणी मला ही दृश्यभाषा जाणवली, रचनेतले सौंदर्य दिसले. आपल्याकडे हे नाही कारण दृश्यभाषेचा अभाव, रचना, सौंदर्यदृष्टीचा तसेच इच्छाशक्तीचा अभाव आहे,”.
मी शाळेत असताना फक्त चित्रकला हा एकच विषय माझा चांगला होता. बाकी सगळा आनंदच होता. त्यामुळे नंतर जे. जे. स्कूलशिवाय पर्याय नव्हता. तिथे माझा चित्रकलेचा पाया पक्का झाला. व्यंगचित्राची कला घरीच असल्याने माझाही ओढा तिकडेच होता. पण कार्टून नेमके सुचते कसे, हे शब्दांत नेमके सांगणे अवघड आहे. रेषा तो विशिष्ट चेहरा घेऊनच उमटतात, त्याआधीच ती व्यक्ती, चेहरा, लकबी, वातावरण, विचार यांचा अभ्यास आत कुठेतरी झालेला असतो. माझ्यावर वडिलांचे, बाळासाहेबांचे संस्कार असल्याचे राज म्हणाले.
“व्यंगचित्रकार असलो, तरी कुणाच्याही व्यंगावर काढायचे नाही, हा पहिला नियम आहे. दुसरे म्हणजे, आपले चित्र कोणत्यातरी कोनातून समाजाशी जोडलेले हवे, असे सांगून राज म्हणाले,“मी राजकारणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. मला जे सुचते, व्हावेसे वाटते, ते प्रकट करण्याचे माध्यम म्हणून मी राजकारणाकडे पाहतो. टीकाही शिकवतेच, चढउतार येतातच. मी मावळलोय असे कुणी म्हणतात, त्यांना ‘म्हणूनच मी उगवणार आहे’ हे सांगू शकतो,”.
अमिताभची दाद
एका प्रदर्शनासाठी अमिताभ बच्चन यांचे कॅरिक्रेचर करायचे होते. पण एका कॅन्व्हासवर ते मावेचनात. शेवटी दोन फ्रेम जोडून ते पूर्ण केले. ते आधीच विकले गेले होते. पण प्रदर्शन पाहायला आलेल्या अमिताभ यांनी ते पाहिले आणि लगेच ते मागितले. मी ते विकले गेल्याचे सांगितल्यावर ते म्हणाले, ‘त्यांना नवे काढून दे, हे मलाच हवे,’ आजही बच्चन यांच्या घराच्या जिन्यातील भिंतीवर हे कॅरिक्रेचर आहे. काहीजण मात्र ‘असा दिसतो का मी’ असे म्हणून रुसतात, नाराज होतात.
बातम्या आणखी आहेत...