आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray News In Marathi, Maharashtra Navnirman Sena, Divya Marathi

राज ठाकरे यांच्या ‘पुणे प्रेमा’वर संशय,मनसेची आज पुण्यात सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवणार आहेत. त्यांची पहिली सभा सोमवारी (दि. 31) पुण्यात होणार आहे, या वेळी मनसेचे लोकसभेचे राज्यातील सर्व उमेदवार उपस्थित राहणार आहेत.


मनसेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात दहा ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. येत्या आठवडाभरात राज्यात ठाकरे एकूण दहा सभा घेणार आहेत. मात्र त्यापैकी तीन सभा एकट्या पुण्यातच होणार आहेत. मात्र राज यांच्या या पुणे‘प्रेमा’वर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जातोय. पुण्यातील कॉँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांचे सासरे, बिल्डर अविनाश भोसले यांच्याशी राज यांच्या असलेल्या संबंधांचा आधार या संशयाला दिला जात आहे.
2009 च्या निवडणुकीतही पुण्यात मनसेच्या उमेदवाराने घेतलेल्या 75 हजारांहून अधिक मतांमुळे कॉँग्रेसला विजय मिळाला होता. अत्यंत नवखा उमेदवार देऊनही केवळ राज ठाकरे यांच्या सभांना मिळालेल्या तुफान प्रतिसादामुळे मनसेने मोठ्या प्रमाणात मते खेचली होती. त्या वेळचे कॉँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी यांनी नारायण राणे यांच्या माध्यमातून राज यांना पुण्यात सभा घेण्यासाठी राजी केल्याचे सांगितले जाते. यंदाच्या निवडणुकीतही पुण्यात कॉँग्रेसविरोधी जनमत आहे. या मतांमध्ये विभाजन करण्यात मनसे यशस्वी झाल्यास कॉंग्रेसची विजयाकडची वाट सोपी होईल, असा कयास या मागे आहे.


मनसेच्या पदाधिका-यांनी मात्र विरोधकांचा हा दावा खोडून काढला आहे. दीपक पायगुडे यांच्या रूपाने मनसेचा पश्चिम महाराष्‍ट्रातील पहिला खासदार पुण्यातून निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कॉँग्रेसच्या पदाधिका-यांनी याबद्दल भाष्य करणे टाळले.


मनसेचा प्रत्येक खासदार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देईल, अशी घोषणा राज यांनी केली आहे. दरम्यानच्या काळात मोदींच्या नावाचा वापर करत असल्याबद्दल भाजपने राज यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या पहिल्याच सभेत राज यांचे मोदीप्रेम कायम राहणार का, याबद्दल उत्सुकता आहे. मोदींनाच पंतप्रधान करायचे असेल तर मनसेला मत का द्यावे, याचे उत्तर राज काय देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


सभांचा समारोप विदर्भात
31 मार्च - पुणे
1 एप्रिल - शिरुर
2 एप्रिल - डोंबविली (पश्चिम)
3 एप्रिल - मुंबई
4 एप्रिल - नवी मुंबई
5 एप्रिल - नाशकात दोन सभा
6 एप्रिल - पुण्यात दोन सभा
7 एप्रिल - यवतमाळ
2009 च्या निवडणुकीतही पुण्यात मनसेच्या उमेदवाराने घेतलेल्या 75 हजारांहून अधिक मतांमुळे कॉँग्रेसला विजय मिळाला होता.