आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाचा फियास्को: पुण्यातली हाक पुण्यातच विरली; मोजक्या कार्यकर्त्यांचा ठिय्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पोलिसांनी मंगळवारी रात्रीपासूनच लावलेल्या ‘फील्डिंग’मुळे मनसेच्या बहुचर्चित ‘रास्ता रोको’ आंदोलनाचा बुधवारी पुण्यात पुरता फज्जा उडाला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला लक्ष्य करण्याच्या किरकोळ घटना वगळता ‘रास्ता रोको’चा प्रभाव कुठेही दिसला नाही. दुपारनंतर राज ठाकरे यांनीच आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केल्यानंतर तर आंदोलनातली हवाच निघून गेली.

एकूण 28 नगरसेवक असल्याने पुण्यात मनसे कार्यकर्त्यांची ताकद मोठी असल्याचे मानले जात होते. म्हणूनच टोलविरुद्धच्या आंदोलनाची हाक राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील एस.पी. कॉलेजच्या मैदानावरील जाहीर सभेतून दिली होती. सभेला मिळालेला तुडुंब प्रतिसाद पाहता बुधवारच्या ‘रास्ता रोको’ची सर्वाधिक धग पुण्यात दिसून येण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पोलिसांनाही या दृष्टीने तयारी केली होती. प्रत्यक्षात मात्र मनसेच्या नेतृत्त्वाचा प्रभाव आणि राज यांना ऐकायला जमलेली कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त फौज पोलिसांच्या तयारीपुढे कुचकामी ठरल्याचे दिसून आले.

नेते ताब्यात, आंदोलन समाप्त
पिंपरी-चिंचवडपासून लोणावळ्यापर्यंत वाहतूक सुरळीत सुरू राहिली. पुण्यात कात्रज आणि चांदणी चौकात महामार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. येथील आंदोलनाचे नेतृत्त्व पुण्यातील नगरसेवकांनी केले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन संपले. मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. राज ठाकरे यांना मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आल्यानंतर शहरात बसगाड्यांवर दगडफेक करण्याच्या घटना दोन ठिकाणी घडल्या.

नुसतीच ‘एंटरटेनमेंट’
राज ठाकरे यांच्या सभेस साठ हजारांहून अधिक लोकांनी गर्दी केली होती. ‘येत्या बारा तारखेला मी स्वत: रस्त्यावर उतरून आंदोलनाचे नेतृत्त्व करीन,’ या त्यांच्या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला होता. प्रत्यक्षात मात्र ठाकरे यांच्या सभेला बघ्यांचीच गर्दी सर्वाधिक असल्याचे बुधवारी आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले. ‘माझी सभा म्हणजे ‘एंटरटेनमेंट’ नव्हे,’ असे सांगणार्‍या राज यांची सभा पुणेकरांसाठी मात्र ‘एंटरटेनमेंट’च ठरली.

महामार्ग दोन तास विस्कळीत
मुंबई-पुणे महामार्गावरील खंडाळा घाटातील अमृतांजन पॉइंटजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास रास्ता-रोकोची पहिली झलक दिसली. मनसे कार्यकर्त्यांनी दोन कंटनेरच्या टायरमधली हवा सोडून दिल्यामुळे वाहतूक खोळंबली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला केल्यानंतर दोन तासांत वाहतूक पूर्ववत झाली. सोमाटणे फाट्यावरच्या टोलनाक्यावर जोरदार घोषणाबाजी करत रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला; परंतु पोलिसी बळापुढे कार्यकर्त्यांना माघार घ्यावी लागली. द्रुतगती महामार्ग बंद पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ठिकठिकाणी तत्काळ ताब्यात घेतल्याने पुन्हा रस्त्यावर कोणी उतरले नाही.

एसीपी साळुंखे- मॅन फ द डे
मनसेचे मुंबईतील रास्ता रोको आंदोलन यशस्वीपणे हाताळून त्याच्या तीव्रतेतील हवा काढून घेण्यात पोलिस प्रशासन बुधवारी यशस्वी ठरले. या दिवसाचे मॅन फ द डे ठरले अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण साळुंखे. त्यांच्या चोख नियोजनामुळे अनुचित प्रकार झाला नाही. त्यांनी चुनाभट्टी परिसरात राज यांना ताब्यात घेतले, त्या ठिकाणी महामार्गाला समांतर दोन रस्ते आहेत. या भागात जरी चार-पाच तास रास्ता रोको झाला असता तरी वाहतूक दोन पर्यायी मार्गाने वळवता आली असती. तसेच राज यांना ज्या आरसीएफ पोलिस ठाण्यात आणले गेले ते स्थळ महामार्गापासून बरेच आत आहे. त्यामुळे राज यांच्यापाठोपाठ शेकडो कार्यकर्ते आंदोलन सोडून पोलिस ठाण्याकडे आले, परिणामी काही वेळातच महामार्ग मोकळा झाला अन् कोंडी सुटली.