आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राज’मार्ग सोडून ठाकरेंचा गुंगारा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन राज्याच्या दुष्काळी दौर्‍याचा प्रारंभ केला. दुष्काळी दौर्‍यावर निघालेल्या ठाकरे यांच्या स्वागतासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी मनसे पदाधिकार्‍यांनी केली होती. मात्र, ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना गुंगारा देत अचानकपणे सातार्‍याला जाणारा मुख्य मार्ग सोडून पुण्याच्या गल्लीबोळातून पुण्याबाहेर पडणे पसंत केले.

ठाकरे यांना निरोप देण्यासाठी मनसेच्या नगरसेवकांनी सातारा रस्त्यावर ठिकठिकाणी शेकडो फ्लेक्स आणि कमानी लावल्या होत्या. चौकाचौकांत शेकडोंनी कार्यकर्ते जमले होते. ठाकरे यांच्या वाहनासमोर पाचशेहून अधिक दुचाकी-चारचाकी वाहनांमधून शेकडो कार्यकर्ते जोरजोरात घोषणा देत निघाले होते. मात्र, त्यांनी अचानकपणे पुढे असलेल्या कार्यकर्त्यांना चकमा देत स्वत:ची गाडी पुण्याच्या बोळकांडातून घ्यायला लावली. कसबा गणपती आणि दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या मागे असलेले ठाकरे कुठे गायब झाले हे कार्यकर्त्यांना समजलेच नाही.
त्यानंतर अचानक कात्रज घाटाच्या अलीकडच्या चौकात मनसेचे पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्या वॉर्डात ठाकरे दाखल झाले. या ठिकाणी फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. गाडीत बसूनच त्यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केले व स्वागत स्वीकारले. त्यानंतर ठाकरे यांची गाडी व त्यांच्या ताफ्यातील इतर गाड्या वेगाने सातार्‍याच्या दिशेने धावल्या. यामुळे त्यांच्या स्वागतासाठी सकाळपासून रस्त्यावर थांबलेल्या कार्यकर्त्यांची निराशा झाली. 10 फेब्रुवारी ते 3 एप्रिल यादरम्यान राज्यात आठ जाहीर सभा आणि 30 पदाधिकारी बैठका राज घेणार आहेत.

अतिउत्साही कार्यकर्ते - मनसे कार्यकर्त्यांच्या अलोट प्रेमाचा फटका राज यांना पुण्यात सहन करावा लागला. दुष्काळी जनतेच्या अडचणी समजून घेण्यासाठी महाराष्ट्र दौर्‍यावर निघण्यासाठी त्यांनी पुण्याची निवड केली, परंतु या दौर्‍याचे औचित्य लक्षात न घेता कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या आवाजाने कसबा गणपतीजवळची सकाळ दणाणून सोडली. त्यांचे आगमन झाल्यानंतर ठिकठिकाणी फटाके फोडण्यात आले.

सातार्‍यात हुल्लडबाजी - शनिवारी ठाकरे यांचे सातार्‍यात आगमन झाल्यानंतर काही अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या दणका शासकीय विर्शामगृहातील अंतर्गत सजावटीला बसला. ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. यानंतर पोलिसांनी राज यांना सुरक्षेत त्यांच्या रूमपर्यंत नेले. रविवारी ठाकरे पत्रकारांशी बोलणार आहेत.