आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारांसाठी भाजपचा इतर पक्षांवर डोळा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भारतीय जनता पक्षाला एवढ्या वर्षांनंतरही निडणुकीसाठी योग्य उमेदवार सापडत नाहीत. त्यामुळे अन्य पक्षांतील ‘इनकमिंग उमेदवारा’वर भाजपचा डोळा आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने अशा ‘आयारामां’च्या जोरावरच यश मिळवले, असेही ते म्हणाले.
  
राज ठाकरे यांच्या हस्ते  सोमवारी सायंकाळी भांडारकर रस्त्यावरील मनसेच्या निवडणूक कार्यालयाचे उद््घाटन झाले त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शिवस्मारक, राममंदिर, नोटाबंदी अशा मुद्द्यांवरही राज यांनी भाजपवर तोंडसुख घेतले.
 
लोकसभा आणि विधानसभेत मोदी यांच्या प्रभावाने भाजपने यश मिळवले. पण स्थानिक पातळीवर निवडणुकीसाठी त्यांना योग्य उमेदवार मिळत नाहीत हे दुर्दैवी आहे. त्यांची भिस्त आयारामांवर आहे. मनसेचे काही उमेदवारही भाजपच्या वाटेवर आहेत, यासंदर्भात विचारल्यावर राज म्हणाले,‘मनसेमधून कुणी तिकडे गेला तरी काहीही बिघडत नाही. माझा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम उमेदवार आहे. त्यामुळे निवडणुकीत आम्ही ताकदीनेच उतरू.’

राममंदिराची उभारणी करता न आल्याने सध्या भाजपकडून स्थानकांची नामकरणे सुरू आहेत. केंद्रात त्यांच्याकडे बहुमत आहे तरी मंदिराची उभारणी करता येत नाही. शिवस्मारकाबाबतही हाच प्रकार आहे. सध्याच्या शिवस्मारकासाठीचा खर्च  राज्यातील अस्तित्वात असणाऱ्या गडकोटांवर खर्च केला तर ते खऱ्या अर्थाने छत्रपतींचे स्मारक ठरेल, असे राज म्हणाले. नोटाबंदीचा निर्णय फसलेला आहे, त्यामुळेच नवनव्या घोषणांची आतषबाजी सुरू आहे. एकूणच भाजपला घोषणाबाजीची मोठी हौस आहे, असे ते म्हणाले. मनसेचे गटनेते रवींद्र धंगेकर भाजपच्या वाटेवर आहेत, याविषयी राज यांनी ‘धंगेकर यांचे सध्याचे स्टेटस मला माहिती नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली.  

न्यायालयाने वस्तुस्थिती पहावी
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रचारात जात आणि धर्मविरोधी प्रचार करू नये असा निर्णय दिला आहे. यावर राज म्हणाले,‘भाषावार प्रांतरचनेनुसार देशाची विभागणी झाली आहे. महाराष्ट्राची रचना वेगळी आहे. परराज्यांतून राज्यात येणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे. या गोष्टी न्यायालयाने समजून घेणे गरजेचे आहे. वस्तुस्थिती काय आहे हे न्यायालयाने पाहावे. आम्ही कुणाच्या धर्मावर जात नाही तसेच कुणी आमच्या धर्मावर येऊ नये.” 
नोटबंदीपासून राम मंदिरापर्यंत
नोटबंदीपासून राम मंदिर स्टेशन आणि शिवस्मारक म्हणजे निव्वळ घोषणा असल्याचा हल्ला ठाकरेंनी चढवला. एका प्रश्नाच्या उत्तरात ठाकरे म्हणाले, भाषिक अस्मिता या महत्त्वाच्या असतात. कोर्टात जाणारे लोक कोण आहे, असाही सवाल त्यांनी केला. मुंबईतील राम मंदिर स्टेशनबद्दल विचारलेल्या एका प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, भाजपकडे आता पूर्ण बहुमत आहे. राम मंदिराचा मुद्द्दा त्यांनी पूर्ण बाजूला केला आहे आणि स्टेशन उभारले. स्टेशन काय उभारता असा, सवाल त्यांनी भाजपला केला. ठाकरे म्हणाले, भाजपने राम मंदिराच्या नावाने अनेक वर्षे राजकारण केले आहे. विटा आणि गंगाजळातून कमाई केली. त्याचा हिशेबही अजून दिलेला नाही. आता त्यांचे सरकार आहे तेव्हा राम मंदिर उभारले पाहिजे. 
 
भाजपला घोषणांची हौस
शिवस्मारक म्हणजे निव्वळ मतांसाठीचे राजकारण असल्याचा आरोप राज यांनी फडणवीस सरकारवर केला. ते म्हणाले, भाजपला केवळ घोषणा करण्याची हौस आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा दोन इंच मोठा पुतळा उभारण्याच्या बढाया मारल्या गेल्या, मात्र हा पुतळा कोण उभारणार, याचे शिल्पकार कोण, यापूर्वीचा त्यांचा असे भव्य पुतळे उभारण्याचा कितपत अनुभव आहे ? असे रोखठोक सवाल त्यांनी केले. राज ठाकरे म्हणाले, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बेटावर उभारलेला असून मुंबईत समुद्रात भरती टाकून शिवस्मारक उभारले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन अधिक गरजेचे असल्याचे ठाकरे म्हणाले. 
 
नगरपालिकेतील विजय भाजपचा नाही 
- भाजप फक्त मोदींच्या नावावर मते मागत आहे. त्यांच्याकडे स्वतःचे म्हणता येतील असे उमेदवार देखिल नाही. 
-  नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे आयात केलेले उमेदवार भाजपने आपल्या तिकीटावर उभे केले. हा खरा विजय त्या उमेदवारांचा असल्याचे ठाकरे म्हणाले. 
- 1952 साली जन्मलेल्या पक्षाला आजही त्यांचे स्वतःचे म्हणता येतील असे उमदेवार देता आले नसल्याची बोचरी टीका त्यांनी केली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...