आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thakare Not Completed Pune Visit And Returned To Mumbai

पुणे दौरा अर्धवट टाकून राज तातडीने मुंबईकडे!, नगरसेवकांची तात्पुरती सुटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - तीन दिवसांचा नियोजित पुणे दौरा काही तासांतच आटोपता घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळीच मुंबईचा रस्ता धरला. नाशिकपाठोपाठ पुण्यातील नगरसेवकांची झाडाझडती घेण्यासाठी ते दोन दिवस मुक्काम करणार होते. दरम्यान, ठाकरे यांनी दौरा रद्द केल्यामुळे मनसे पदाधिकारी आणि नगरसेवकांचा जीव मात्र भांड्यात पडला आहे.
बुधवारी सकाळी राज ठरल्याप्रमाणे पुण्यास आले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रसाद पुरंदरे तसेच अन्य काही मित्रमंडळींच्या त्यांनी भेटी घेतल्या. त्यानंतर अचानक ते मुंबईला गेले. पुणे महापालिकेतील विरोधी पक्षाची भूमिका बजावणार्‍या मनसे नगरसेवकांच्या कामाचा आढावा ते गुरुवारी घेणार होते. ‘काम जमत नसेल तर सत्ता सोडा’ असा इशारा राज ठाकरे यांनी मंगळवारीच नाशिकच्या महापौर व नगरसेवकांना दिला होता. या पाश्र्वभूमीवर त्यांच्या पुण्यातील बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
सूत्रांनी सांगितले की, लोकसभा निवडणूक आणि महापालिकेतील नगरसेवकांची कामगिरी या दोन विषयांवर ते स्थानिक नगरसेवकांशी चर्चा करणार होते.
पुणे महापालिकेतील विरोधी पक्ष म्हणून गेल्या तीन वर्षातील मनसेची कामगिरी अत्यंत सुमार राहिलेली आहे. नागरिकांमध्ये भ्रमनिरास झाल्याचे चित्र आहे, स्थानिक प्रसारमाध्यमांमधूनही ‘मनसे’ नगरसेवकांच्या खराब कामगिरीची चर्चा सातत्याने होत असते.
तसेच पक्षातील वाढती गटबाजीही नेतृत्त्वासाठी डोकेदुखी ठरली आहे. काही महिन्यांपूर्वीच पक्ष कार्यालयात दोन गटांमध्ये हाणामारीपर्यंत मजल गेली होती. नव्याने येणारे कार्यकर्ते-जुने कार्यकर्ते, नगरसेवक-पदाधिकारी यांच्यातही मतभेद आहेत. या तक्रारींचा पाढा कृष्णकुंजपर्यंत गेला होता.