आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज, दुष्काळ समजून घ्या - जयंत पाटील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘वर्णने ऐकून भाषणे करण्याऐवजी राज ठाकरे यांनी दुष्काळ समजावून अधिक माहिती घेण्याची गरज आहे. लवाजमा घेऊन फिरण्यापेक्षा त्यांनी दुष्काळी भागाची नीट पाहणी करावी,’ अशी बोचरी टीका राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी केली.

दोन दिवसांपासून राज ठाकरे सांगली, सातारा आणि कोल्हापूर या ‘राष्ट्रवादी’च्या बालेकिल्ल्यात प्रवास करीत आहेत. या भागात मनसेचे जाळे नसूनही ठाकरे यांना युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज यांनी ‘दुष्काळी भागातील नेत्यांचा दौरा भंपकपणा’ ठरवला होता.

‘राष्ट्रवादी’चे पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. पाटील म्हणाले की, दुष्काळ कसा असतो, जनावरांच्या चारा छावण्या कशा चालवल्या जातात, पाणीपुरवठा कसा होतो याची माहिती ठाकरे यांनी प्रत्यक्ष जाऊन घेतली पाहिजे. ऐकीव वर्णनांच्या आधारे भाषणे करण्याऐवजी त्यांनी खेडेगावांमध्ये एकटे जाऊन परिस्थिती पाहायला हवी. ठाकरे बहुधा महाराष्ट्रात पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु दुष्काळात राजकारण आणण्याची गरज नाही. सरकारची तशी इच्छा नाही. विरोधकांनाही तसे वाटत नाही. एकमेकांवर टीका करून उपयोग नाही. जबाबदारीने प्रश्न सोडवला पाहिजे.’

दिल्ली दर्शन...नको रे बाबा
‘राष्ट्रवादी’च्या वरिष्ठ मंत्र्यांनी आता दिल्लीत जाऊन काम केले पाहिजे, अशी सूचना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. पाटील स्वत: मात्र दिल्लीत जाण्यास नाखुश असल्याचे दिसून आले. ते म्हणाले, ‘‘मी पक्षात ज्युनियरच आहे. शिवाय दुस-यांना निवडून आणण्याची आमची क्षमता असल्याने स्वत: न उभे राहताही लोकसभेतील पक्षाच्या जागा आम्ही वाढवू शकतो.’

खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात लढण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ हातकणंगले मतदारसंघात प्रबळ उमेदवाराच्या शोधात आहे. जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील दोन तालुके हातकणंगले मतदारसंघात येत असल्याने पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.